मुंबईतील अनेक ठिकाणी शिवसेनेच्या वतीने लावण्यात येणारे शिव वडापाव स्टॉल्स हे अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या परवाना विभाग आणि आरोग्य विभागाने स्पष्ट केल्यानंतरही दहिसर,बोरिवली आणि कांदिवलीमध्ये तब्बल १५ शिव वडापाव स्टॉल्सना विभागाच्या सहायक आयुक्तांनी परवाना देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करून परवाना देण्याची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शिव वडापाव स्टॉल्स हे अनधिकृत असल्यामुळे महापालिकेच्या गिनतीत ते नाही. त्यामुळे ते स्टॉल्स किती आहेत याचीही नोंद महापालिकेच्या दप्तरी नसली तरीही २४ प्रभागांपैकी १० प्रभागांमध्येच तब्बल १६० शिव वडापाव स्टॉल्स असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, हे सर्व स्टॉल्स अनधिकृत असताना केवळ १५ स्टॉल्सना परवानगी देण्यासाठी बनवलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे महापालिकेच्या धोरणात विसंगती आढळून येत असून या तिन्ही सहायक आयुक्तांनी स्वअधिकारात हे परवाने देत अनधिकृत कामे केल्याचे उघड झाले आहे.
मुंबईत शिवसेनेच्या वतीने शिव वडापाव स्टॉल्स लावले जात आहेत. सुमारे ६० ते ८५ हजार रुपयांना या स्टॉल्सची शिवसेनेकडून विक्री होत आहे. पण हे सर्व स्टॉल्स मुंबईत अनधिकृतच चालवले जात आहेत. या स्टॉल्सनी रस्ते आणि पदपथ अडवले आहेत. मात्र अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना या अनधिकृत स्टॉल्सवर महापालिकेच्या वतीने कोणतीही कारवाई केली जात नाही. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी मागवलेल्या माहितीतून या अनधिकृत स्टॉल्सना परवाना विभागाने कोणतीही परवानगी दिली नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे हे अनधिकृत स्टॉल्स अधिकृत करण्याबाबत धोरण जाहीर करण्याची मागणी शिवसेनेने केली होती.
त्यानंतर या शिव वडापाव स्टॉल्सबाबत राष्ट्रवादीचे महापालिका गटनेते धनंजय पिसाळ यांनीही मागवलेल्या माहितीत परवाना विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने आपण कोणतेही परवाने दिले नसल्याचे लेखी कळवले आहे. मात्र, आता याच संदर्भात काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापालिका सभागृहात उपस्थित केलेल्या अल्पमुदतीच्या प्रश्नांमध्येही प्रशासनाने शिव वडापाव स्टॉल्सना कोणतीही परवानगी दिली नसल्याचे म्हटले आहे. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील ‘आर-दक्षिण, आर-मध्य आणि आर-उत्तर’ हे वगळता सर्वाना वैयक्तिक लेखी स्वरूपात शिव वडापाव स्टॉल्सना परवानगी दिली नसल्याचे म्हटले आहे. कांदिवलीत ०४ (आर-दक्षिण), बोरिवलीत ०६ (आर-मध्य) आणि दहिसरमध्ये ०५ (आर-उत्तर) शिव वडापाव स्टॉल्सना परवाना देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली.
सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ एप्रिल २०१५ रोजी एक परिपत्रक सर्व विभाग कार्यालयांना जारी केले. या परिपत्रकानुसार शिव वडापाव हातगाडी चालविण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाचे सहायक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीस आहेत,असे म्हटले आहे. बृहन्मुंबईत खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय करण्यासाठी महापालिकेच्या कलम ३९४ अंतर्गत परवान्यासाठी आरोग्य खात्याने सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून निश्चित केलेल्या निकषानुसार व्यापारी गाळा असणे आवश्यक आहे. शिव वडापाव गाडीमार्फत खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय आरोग्य खात्याने निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करू शकत नसल्यामुळे त्यांना परवाना मंजूर करता येत नसल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी या परिपत्रकात म्हटले आहे.
मुंबईत अनधिकृत असलेले शिव वडापाव स्टॉल्स हे सर्वाधिक असून तब्बल ५२ स्टॉल्स भांडुप विभागात आहेत. त्याखालोखाल शिवडी, परळ, लालबागमध्ये ३९ स्टॉल्स असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
मात्र, कुलाबा,नरिमन पॉइंट,फोर्ट या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत एकही शिव वडापाव स्टॉल्स नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

