झारखंडमध्ये सोमवारची पहाट भाविकांसाठी ‘काळ’

झारखंडमध्ये सोमवारची पहाट भाविकांसाठी ‘काळ’

झारखंडमध्ये सोमवारची पहाट भाविकांसाठी ‘काळ’ बनून आली. देवघर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वैद्यनाथ धाम येथे भाविकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी होऊन ११ भाविकांना प्राण गमवावे लागले तर ५० जण जखमी झाले.

पोलीस दलाचे प्रवक्ते एस. एन. प्रधान यांनी १० भाविक मृत पावल्याचे म्हटले आहे. मृतांमध्ये ९ पुरुष आणि एक महिला असल्याचे त्यांनी सांगितले तर स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र मृतांचा आकडा ११ असल्याचे स्पष्ट केले.

बेलाबागनमध्ये भाविक रात्रभर दर्शनाच्या प्रतीक्षेत रांग लावून होते. मंदिरापासून सुमारे तीन किलो मीटर रांग लागली होती. त्यामुळे सकाळी दर्शन खुले झाल्यानंतर भाविकांनी रांग तोडली आणि ही दुर्घटना घडली, असे शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मृतांमध्ये झारखंडबरोबरच बिहार, उत्तर प्रदेश तसेच नेपाळमधील भाविकांचाही समावेश असून त्यांचा अधिक तपशील अद्याप कळू शकलेला नाही.

दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं असून जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

देवघरमध्ये २०१२ मध्येही अशाच प्रकारे चेंगराचेंगरी होऊन ९ भाविक ठार तर ३० भाविक जखमी झाले होते. मात्र त्यानंतरही सरकारने कोणतीही ठोस अशी व्यवस्था कावड यात्रेसाठी केली नाही. श्रावणी सोमवारी येथील मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळत असताना सुरक्षेच्या बाबतीत मात्र ढिलाईच बाळगली जाते. आजच्या दुर्घटनेने वैद्यनाथ धामाच्या सुरक्षेची पुन्हा एकदा पोलखोल झाल्याचे एका भाविकाने सांगितले. मंदिराच्या बाहेर भाविकांना रोखून धरण्यात आल्यानेच चेंगराचेंगरी झाल्याचेही हा भाविक म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *