शरीराचे सात तुकडे करणाऱ्या रहस्यमय खुनाचा अखेर उलगडा

ई-रिक्षा चालकांमधील वर्चस्वाच्या वादातून एकाचा खून करून त्याच्या शरीराचे सात तुकडे करून गांधीसागर तलाव परिसरात फेकण्यात आले होते. मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झालेले असताना डिजिटल छायाचित्र करून त्या आधारे खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुधाकर देविदास रंगारी ऊर्फ जेम्स बॉण्ड (४८) रा. आवळेनगर, जरीपटका, असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी राहुल पद्माकर भोतमांगे (२६) रा.बारसेनगर आणि राहुल ज्ञानेश्वर धापोडकर (२५) रा. तांडापेठ अशी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. गेल्या १० जुलैला गांधीसागरमध्ये दोन पोत्यांमध्ये एका व्यक्तीच्या शरीराचे सात तुकडे सापडले होते. गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, धड व शीर वेगवेगळे झाले होते. चेहरा फुललेला व कुजायला लागला होता. त्यावरून मृताची ओळख पटत नव्हती. शेवटी पोलिसांनी त्याच्या तशाच चेहऱ्यावरून लठ्ठ व रोड स्वरूपातील दोन डिजिटल छायाचित्र तयार केले असता त्याची ओळख पटली. आरोपींनी शरीराचे तुकडे केले. ते दोन पोत्यात भरून  गांधीसागरमध्ये फेकले होते, अशी माहिती भरणे यांनी दिली. यावेळी पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

३००  सीसीटीव्हींच्या चलचित्रांची पाहणी

सुधाकर रंगारी याला आरोपींनी दारू पाजल्यानंतर खून करण्यासाठी रिक्षातून फिरवले. मात्र, योग्य ती जागा मिळाली नाही. शेवटी त्यांनी रिक्शा वैशाली नगरात वळवला. तेथे हत्याकांड घडले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. याकरिता पोलिसांनी ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चलचित्र तपासले. कोणताही सुगावा नसताना हे हत्याकांड उघडकीस आणणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ८० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *