पुणे शहरात आठवडाभरापासून संततधार पाऊस पडत असल्याने शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या धरणात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून ४५ हजार ४७४ क्युसेक पाणी नदी पात्रता सोडण्यात आले आहे. परिणामी नदी पात्रालगत असलेल्या मंगळवार पेठ येथील वसाहतीतील घरात पाणी शिरले. तर याच वसाहतीमधील आठवीत शिकणारी निशाद रफिक शेखचे घर देखील पाण्याखाली गेले असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवाय दोन दिवसांवर येऊन ठेपलेलील परीक्षा आता मी कशी देऊ? असा सवालही तिने उपस्थित केला आहे. कारण, सर्व सामान तर पाण्यात गेलं आहे.
शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरण पट्यात सातत्याने पाऊस पडत आहे. सध्य स्थितीला ६०० पेक्षा अधिक कुटुंबाच्या घरात नदीचे पाणी शिरले आहे. ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. अशा व्यक्तींची आसपासच्या महापालिका शाळा आणि समाज मंदिरात व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील मंगळवार पेठ भीमनगर येथील एका वसाहतीमध्ये १०० पेक्षा अधिक घरांमध्ये आज पाणी शिरले असता. तेथील नागरिकांशी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने संवाद साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी इयत्ता आठवीत शिकणारी निशाद रफिक शेख हिच्याशी संवाद साधला असता, तिने आपली व्यथा मांडत सांगितले की, मी लहानपणापासून पाहते की पावसाळ्यात थोडसा जरी पाऊस झाला की, धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यात येते. त्यावेळी आमच्या वसाहतीमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार घडत असतो. यामध्ये आमचे घर किमान चार दिवस पाण्यात आणि त्यानंतर किमान आणखी पुढील चार दिवस घरातील परिस्थिती पूर्ववत होण्यास लागतात. त्यामुळे आमचे आठवडाभर खूप हाल होतात. हे प्रत्येक वर्षीचे झाले आहे. यंदा माझी चाचणी परीक्षा मंगळवारी असून घर पाण्याखाली गेल्याने पुस्तकं आणि वह्या पाण्याखाली आहेत. आता मी अभ्यास तरी कसा करू? असा सवाल तिने यावेळी उपस्थित केला.
तर याच वसाहतीमधील राहणाऱ्या नम्रता कांबळे या तरूणीशी संवाद साधला असता ती म्हणाली की, मी सीएच्या परीक्षेची तयारी करत असून नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार आहे. मात्र आज घरात पावसाचे पाणी शिरल्याने सर्व पुस्तकं पाण्यात भिजली आहेत. ही पुस्तक आणि माझ्या शिक्षणाचा खर्च मी घरी क्लास घेऊन भागवला आहे. मात्र आता पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे. हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले होते.
