चर्नी रोड येथील महापालिकेच्या सार्वजनिक सुलभ शौचालयात रविवारी एका पंधरा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला. ही मुलगी गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. मुलीला ठार करून गळफास लावण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला असून याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही पंधरा वर्षाची मुलगी चर्नी रोड येथील पदपथावर आई-वडिलांसोबत राहत होती. तिचे कुटुंबीय गजराविक्री करतात. रविवारी सकाळी याच पदपथावर असलेल्या सुलभ शौचालयात मुलगी गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. प्राथामिक तपासामध्ये तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, आपल्या मुलीवर बलात्कार करून तिला फासावर लटकविण्यात आले असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. वैद्यकीय अहवालामध्ये तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे स्प्ष्ट झाले आहे. घरच्यांनी तिचे लग्न ठरविले होते. मनाविरुद्ध लग्न ठरविल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात असून पोलिस याप्रकरणात अधिक तपास करीत आहेत.
