मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनच्या अंत्ययात्रेत लोटलेली गर्दी पाहून मुंबईकर धास्तावले असतानाच, त्यांच्या काळजीत आणखी भर घालणारी माहिती समोर येत आहे. ‘डी’ कंपनीचा म्होरक्या दाऊद इब्राहिम आणि त्याचा ‘राइट हँड’ छोटा शकीलच्या आदेशावरूनच याकूबच्या अंत्ययात्रेत हजारो मुस्लिम सहभागी झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून कळतं. हा दाऊदचा शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्नच मानला जातोय.
दाऊद इब्राहिम हा देशासाठी ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगार आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात तो मुख्य आरोपी आहे. टायगर मेमन, याकूब मेमन आणि अनेक धर्मांधांना सोबत घेऊन त्यानंच हे स्फोट घडवून आणल्याचे अनेक पुरावे पोलिसांकडे आहेत. त्यामुळेच याकूब मेमनच्या फाशीबद्दल ‘डी’ कंपनीमध्ये अस्वस्थता, संताप, सूडभावना आहे. तशी धमकीही छोटा शकील गेल्या आठवड्यात फोन करून दिली आहे. याकूबचा भाऊ टायगरही बदल्याची भाषा करत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि एकूणच तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. असं असतानाच, पोलिसांकडची आतल्या गोटातील एक बातमी ‘टाइम्स’ला कळलीय.
याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेबाबत दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलनं सुरुवातीला शांत राहणंच पसंत केलं. याकूबचा दयाअर्ज मंजूर होईल, असं त्यांना वाटत असावं. पण, तसं झालं नाही आणि ‘डी’ कंपनीत अस्वस्थता पसरली. ३० जुलैला याकूब प्रत्यक्ष फासावर लटकल्यानंतर त्यांच्या हालचालींना वेग आला. याकूबचा मृतदेह मुंबईला आणणार असल्याचं कळताच, दाऊद आणि शकीलनं मुंबईतील आपल्या विश्वासू साथीदारांना फोन लावले आणि त्यांच्या जनाजात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचा हुकूमच सोडला. त्यामुळेच मेमन कुटुंबीयांच्या माहीम इथल्या घराबाहेर, कडेकोट पोलीस बंदोबस्त असूनही १० हजारांहून अधिक जनसमूदाय लोटला होता, तर मरीन लाइन्सच्या बडा कब्रस्तानबाहेर तुडुंब गर्दी होती, अशी सविस्तर माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर दिली. दाऊदच्या आदेशावरून आजही एवढी गर्दी जमा होत असेल, तर ही चिंतेचीच बाब आहे. त्यामुळे येत्या काळात पोलिसांना आणि मुंबईकरांना प्रचंड सतर्क राहणं गरजेचं आहे.
याकूब मेमनच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. भविष्यात त्यातले काही जण दहशतवाद घडवून आणू शकतात, असे ‘ट्विट’ त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पण, त्यांचं म्हणणं साफ चुकीचं आहे, असं या गौप्यस्फोटानंतर म्हणता येत नाही.
दरम्यान, याकूबच्या जनाजात सहभागी झालेले बहुसंख्य लोक हे उत्सुकतेपायी गेले होते, असं मुंबईतील मुस्लीम नेत्यांचं म्हणणं आहे. आपल्या धर्मातील एका व्यक्तीची अंत्ययात्रा असल्यानंही बरेच जण तिथे जमले होते, असाही दावा ते करतात. परंतु, पोलीस अधिकाऱ्यानं दिलेली माहिती याच्या अगदी उलट आणि धक्कादायक आहे.

