शाळेत घडलेल्या एका घटनेमुळे प्रियाचं गणिताच्या अभ्यासात लक्षच लागत नाहीये. पण आईला वाटतं की, प्रियालाच गणिताचा कंटाळा आला असणार. नेमकं काय झालं हे समजून घेण्याची आईची तयारीच नसेल, तर प्रियाचा गणिताचा अभ्यास आज काय कधीच होणार नाही.
आई : झाला का अभ्यास?
प्रिया : अं. हो.
आई : अं. हो म्हणजे? अभ्यास झाला की नाही झाला?
प्रिया : अं म्हणजे मनासारखा नाही झाला.
आई : आता हे काय नवीनच? मनासारखा म्हणजे. .म्हणजे झाला नाही असंच ना? म. सरळ तसं सांग की. अभ्यास करायचाच नसेल तर होईल कसा?
प्रिया : असं काय म्हणतेस आई? मी अभ्यासाला बसले होते ना.?
आई : बसली होतीस खरी. पण डोक्यात विचार दुसरेच असतील तर कसा होणार अभ्यास? नुसता टाइमपास करायचा आणि अभ्यास झाला असं म्हणायचं.
प्रिया : गणिताचा अभ्यास करायला बसलं की त्रस होतो. कंटाळा येतो.
आई : कंटाळा येतो. कुठल्या विषयाचा अभ्यास करताना तुला खूप उत्साह येतो, हे तरी सांग.
प्रिया : अं. म्हणजे तसं. अभ्यास करायला बसल्यावर.
आई : थोडक्यात काय तर तुला एकंदर अभ्यास करायचाच कंटाळा येतो. ही भिकेची लक्षणं आहेत. आम्ही मरमरेस्तोवर काम करायचं, पैसे मिळवायचे, ते तुमच्या शिक्षणासाठी खर्च करायचे आणि तुम्ही. आम्हाला वर तोंड करून सांगायचं की, ‘अभ्यासाचा कंटाळा येतो’.
प्रिया : तसं नाही गं.
आई : म. कसं? लाज नाही वाटत तुला? आम्ही पैसे तुमच्यासाठीच मिळवतो ना?
प्रिया : हो.
आई : म. असे पांग फेडता आमचे.?
प्रिया : मला जरा बोलू देशील का?
आई : हो.हो. आणखी कशा-कशाचा कंटाळा येतोय तेही सांग बरं.
प्रिया : (ओरडून) मला अभ्यासाचा कंटाळा येतो असं मी म्हटलेलंच नाही.
आई : उगाच माङया अंगावर ओरडू नकोस. काही लहानमोठं आहे की नाही?
प्रिया : माझा गणिताचा अभ्यास होत नाही.
आई : होत नाही म्हणजे? तू करत नाहीस म्हणून होत नाही. केलास तर होईल.
प्रिया : आई तुला काय वाटतं, इतकं पण मला समजत नसेल? मला असं म्हणायचं आहे की, मी करते पण होत नाही.
आई : का?
प्रिया : दोन दिवसांपूर्वी माझं शाळेत नीताशी भांडण झालं.
आई : पण याचा ग्णिताशी काय संबंध आहे?
प्रिया : आधी ऐक तर. हे भांडण गणिताच्या तासाला झालं.
आई : तूच तिची काहीतरी खोडी काढली असशील?
प्रिया : मला जरा बोलू देशील का?
आई : हां. बोल.
प्रिया : तुला माहित्यै नीता माङया बाजूलाच बसते. गणिताच्या तासाला नीता माङया वहीत पाहून लिहित होती.
आई : का?
प्रिया : ऐक ना. मला भीती वाटली. जर का सरांनी पाहिलं असतं तर ते तिला ओरडले असते. म्हणून मी तिला हळू आवाजात सांगितलं की पाहू नकोस. पण सरांनी माझा आवाज ऐकला. त्यांना वाटलं मीच तिच्याशी बोलते आहे. तिच्या वहीत पाहते आहे.
आई : आणि मग सरांनी तुला शिक्षा केली. हो ना?
प्रिया : हो.
आई : म. तुला काय म्हणायचं आहे? सरांचं चुकलं? सर मूर्ख आणि तू शहाणी?
प्रिया : तुला काही सांगायला गेलं की.
आई : काय सांगायला गेलं.? मांजर डोळे मिटून दूध पीत असली तरी जगाचे डोळे उघडे असतात ना?
प्रिया : म्हणजे? मला नाही कळलं?
आई : तू सांगशील त्या प्रत्येक गोष्टीवर मी विश्वास ठेवावा, असं तुझं म्हणणं आहे की काय? माझा सरांवर अधिक विश्वास आहे. त्यांनी तुला कॉपी करताना पकडलं म्हणून तुझा हा सगळा कांगावा सुरू आहे.
प्रिया : कांगावा.?
आई : नाहीतर काय? शाळेत काहीतरी झालं म्हणून घरी अभ्यास होत नाही हे मला पटतच नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांच्या तक्रारी मला अजिबात सांगायच्या नाहीत.
प्रिया : का? त्यांचं चुकलं असलं तरी?
आई : हाच आगाऊपणा मला नकोय. शिस्त ही हवीच. मी सांगितलेलं तुला ऐकावंच लागेल. आता निमूटपणो गणिताच्या अभ्यासाला बस. तुझा अभ्यास कसा होत नाही तेच पाहते.
आई : झाला का अभ्यास?
प्रिया : अं. हो.
आई : अं. हो. म्हणजे? अभ्यास झाला की नाही झाला?
प्रिया : अभ्यास झाला तसा. पण मनासारखा नाही झाला.
आई : का बरं.? असं का झालं?
प्रिया : माझं गणिताच्या अभ्यासात लक्षच लागत नाहीये.
आई : (काळजीने) हं. म्हणजे.?
प्रिया : म्हणजे आई आता बघ, मी गेले तासभर अभ्यासाला बसले आहे. पण एका तासात जेवढा अभ्यास व्हायला पाहिजे होता ना. तेवढा झाला नाही.
आई : हे तुझं बोलणं ऐकून मला बरं पण वाटतंय आणि तुझी काळजी पण वाटतेय.
प्रिया : म्हणजे?
आई : अगं प्रिये, अभ्यास करताना तू खूप जागरूक आहेस. किती वेळ बसल्यावर किती अभ्यास व्हायला पाहिजे इथे तुझं लक्ष आहे. आणि पुरेसा अभ्यास झाला नाही म्हणून तू बेचैन आहेस. आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही जर तुझा नीट अभ्यास होत नसेल तर मला काळजी वाटेलच ना?
प्रिया: अं. हो.
आई : एक सांग, अभ्यास होत नाही म्हणजे काय होतं?
प्रिया : म्हणजे.?
आई : म्हणजे, मनात वेगळेच विचार येतात? झोप येते? एकदम कंटाळा येतो? आपण काय वाचतोय तेच समजत नाही?
प्रिया : हो तसंच काहीसं.
आई : नीट सांग.
प्रिया : तू विचारलंस म्हणून बरं झालं बघ. ही कालचीच गोष्ट आहे. तुला माहित्यै नीता माझी खास मैत्रीण. वर्गात माङया बाजूलाच बसते. काल गणिताच्या तासाला ती हळूच माङया वहीत पाहून गणितं सोडवत होती.
आई : अगं बाई ! पण का.? तिला भीती नाही वाटली?
प्रिया : ऐक ना. त्यावेळी मलाच भीती वाटली. समजा सरांनी चुकून पाहिलं तर. ते तिला शिक्षा तर करतीलच पण ते तिच्या पालकांना पण कळवतील. आणि तुला माहित्यै तिची आई किती रागीट आहे ते.?
आई : म. पुढे काय झालं?
प्रिया : मी अगदी हळू आवाजात तिला सांगितलं की असं करू नकोस. शिक्षा होईल.
आई : बरोबर आहे तुझं.
प्रिया : पण त्याचवेळी सरांनी माझा आवाज ऐकला आणि माङयाकडे पाहिलं. त्यांना वाटलं की मीच तिच्या वहीत डोकावते आहे. ते मला वाट्टेल ते बोलले. वर्गात सगळ्यांसमोर त्यांनी माझा अपमान केला. पण त्यावेळी स्वत:ची चूक असूनही नीता गप्प बसली याचं मला खूप म्हणजे खूपच वाईट वाटलं. आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे गणिताचा तास संपल्यावर किंवा शाळा सुटल्यावर नीता मला ‘सॉरी’ सुद्धा म्हणाली नाही. याचा मला खूप त्रस झाला.
आई : आलं लक्षात. म्हणजे तू गणिताच्या अभ्यासाला बसलीस की तुङया डोक्यात सारखे हेच विचार येतात. ‘नीता अशी का वागली?’ हा प्रश्न छळत राहतो. बरोबर.?
प्रिया : हो आई. एकदम बरोबर. नीताच्या अशा वागण्याचे विचार डोक्यात आले की मला काही सुचेनासं होतं. काय करू मी?
आई : हे बघ, माझी पूर्ण खात्री आहे की या सर्व प्रकरणात तुझं काही चुकलेलं नाही. तुङया मनात राग साचला आहे म्हणून तुला त्रस होतोय. तुला एक आयडिया सांगते. तुला नीताविषयी काय वाटतं? तू तिच्यावर का रागावली आहेस? हे तिला आत्ता फोन करून सांग.
प्रिया : मला नाही तिला असं सांगता येणार.
आई : ओके. आतल्या खोलीत जा. भिंतीसमोर उभी राहा आणि अशी कल्पना कर की समोर नीता उभी आहे.
प्रिया : आणि मग.?
आई : तुला जे वाटतं ते मोकळेपणाने मोठय़ानं बोल. तुङया मनातल्या रागाचा निचरा झाला की तू शांत होशील. ऐक माझं.
प्रिया : खरं सांगू. तू मला इतकं छान समजावून सांगितलंस की मला आत्ताच बरं वाटू लागलंय.
आई : (प्रियाला जवळ घेऊन थोपटत) जा, आतल्या खोलीत जा, नीता वाट पाहते आहे. तू बाहेर आलीस की आपण जरा फिरून येऊ.

