दोन मार्गिका असलेल्या हार्बर मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून एसी लोकल सुरू झाल्यानंतर हार्बरवरील उपनगरी गाड्यांचे नियमित वेळापत्रक कोलमडण्यास सुरुवात झाली. दरवाजे उघड-बंद होण्यासाठी लागणारा वेळ, तांत्रिक बिघाड यांमुळे हार्बरवरील एसी लोकल सातत्याने विलंबाने धावत आहेत. त्याचा परिणाम सामान्य लोकल फेऱ्यांवरही होत असल्याने संपूर्ण हार्बर मार्गावरील लोकल वेळापत्रकाचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत एसी लोकल ही अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे.
एसी लोकच्या दरवाज्यात प्रवासी उभे
प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू झाली. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत प्रत्येकी एक फेरी यांसह एकूण १४ फेऱ्या सुरू झाल्या. पहिल्या दिवसापासून एसी लोकल विलंबाने धावू लागली. हार्बरवरील एसी लोकलला जवळपास महिना पूर्ण होत असला तरी एसी आणि सामान्य लोकल सातत्याने २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. मानखुर्द, गोवंडी, चेंबूर अशा रेल्वे स्थानकांवर काही प्रवासी एसी लोकलच्या दरवाज्यात उभे असतात.
त्यामुळे दरवाजा पूर्ण बंद होण्यास अडचणी निर्माण होतात. परिणामी नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ लोकल फलाटावर रेंगाळते. त्याचबरोबर लोकलच्या दरवाज्यात देखील तांत्रिक बिघाडामुळे दरवाजे उघड-बंद होण्यासाठी अधिक वेळ लागतो. दरवाजे पूर्ण बंद झाल्याशिवाय एसी लोकल धावती करणे शक्य होत नाही. एसी लोकलला विलंब झाल्यास त्याचा परिणाम त्या मागे धावणाऱ्या सामान्य लोकल फेऱ्यांवर होतो. विलंबाने पोहोचलेली गाडी विलंबाने रवाना होते, यामुळे हार्बर मार्गावरील एसी आणि सामान्य लोकल फेऱ्या विलंबाने धावत असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तुम्हाला एसी लोकलने प्रवास करायचा आहे?
ऐनवेळी एसी लोकल रद्द होण्यामुळे प्रवाशांकडून एसी तिकिटाचा परतावा मागण्यात येतो. अशावेळी प्रवासी आणि तिकीट विक्री केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतो. हे टाळण्यासाठी तुम्हाला एसी लोकलने खरच प्रवास करायचा आहे का, तुम्हाला एसी लोकलचे तिकीट हवे आहे का, असे प्रश्न विचारून खात्री केल्यानंतरच कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना तिकीट देण्यात येते, असे हार्बर रेल्वे स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले.
