पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचं निधन

भारताच्या इतिहासाची जपणूक करण्यात हयात घालवणारे पद्मश्रीसदाशिव गोरक्षकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे इतिहासाचा जाणकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

सदाशिवराव गोरक्षकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज सकाळी वासिंद येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) साहाय्यक अभिरक्षक म्हणून १९६४ मध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. संग्रहालयशास्त्रातील डॉक्टरेटदेखील त्यांनी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कोकणातील देवरूख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय साकारले गेले. तेथे इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित करण्यात आले आहेत.

‘राजभवन्स इन महाराष्ट्र’, ‘अ‍ॅनिमल्स इन इंडियन आर्ट’, ‘द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया’, ‘कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया’, ‘कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. या पुस्तकांच्या शीर्षकातून त्यांच्या लेखनाचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात येते. महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांच्या हातून घडलेली अजून एक लेखनकृती म्हणजे ‘डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र’. यात त्यांनी उत्खननातून हाती आलेल्या तिसऱ्या शतकातील महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक नमुन्यांच्या आधारे इतिहासाच्या प्रदीर्घ कालौघातील महाराष्ट्राचा दीर्घ प्रवास अधोरेखित केला. तसेच त्यांनी पश्चिम भारतातील गुप्ताकालीन शिल्पकलेवरही लेखन केले. त्यांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाची दखल सरकार दरबारी वेळीच घेतली गेली आणि त्यांना २००३मध्ये ‘पद्मश्री’ हा नागरी सन्मान देउन गौरवण्यात आले होते. २०१६ मध्ये त्यांना ‘चतुरंग’च्या जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *