देशातील मोठ्या प्रमाणावरील यूजर ‘आयफोन’चा वापर करू इच्छित आहे. मात्र, किंमत अधिक असल्याने त्याची खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे भारतात ‘अॅपल’चा एकूण बाजारहिस्सा अवघा एक टक्का आहे. देशातच उत्पादन सुरू झाल्यानंतर ‘आयफोन’च्या वितरकांच्या कमिशनमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ‘फॉक्सकॉन’च्या मदतीने भारतात प्रकल्प उभारून ‘अॅपल’ने युरोपीयन बाजारात ‘आयफोन’ची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने २०१६मध्ये देशात ‘आयफोन’च्या उत्पादनास सुरुवात केली होती. मात्र, गेल्या महिन्यापासून ही उत्पादने युरोपात निर्यात होण्यास सुरुवात झाली आहे. देशात तयार होणारी उत्पादने युरोपीयन बाजारात पाठवून भारतात एक्स्पोर्ट हब तयार करण्याची कंपनीची योजना आहे.
…
८० टक्के उपकरणांची निर्यात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘फॉक्सकॉन’च्या बेंगळुरू येथील प्रकल्पात तयार होणाऱ्या एकूण ‘आयफोन’पैकी ८० टक्के उपकरणांची निर्यात करण्यात येत आहे. ‘फॉक्सकॉन’ने गेल्या वर्षीपासून या प्रकल्पात ‘आयफोन ६’ आणि ‘आयफोन ७’च्या उत्पादनास सुरुवात केली.
