‘मेट्रो’चे दर दहा ते ३५ रुपये करण्याची शिफारस

मुंबईतील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील ‘मेट्रो-१’ सेवा ही टिकण्याबरोबरच प्रवाशांना परवडायलाही हवी, असा निष्कर्ष नोंदवून मेट्रोचे सध्याचे दरही कमी करण्याची शिफारस दरनिश्चिती समितीने केली आहे. मेट्रोचे प्रवासी भाडे दहा ते ३५ रुपये ठेवावे आणि करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे पुढील चार वर्षे हे दर ठेवावेत, अशी महत्त्वाची शिफारस समितीने केली आहे.

सध्या मुंबईत सुरू असलेल्या ११.४ कि.मी. लांबीच्या या एकमेव मेट्रो मार्गावर मुंबई मेट्रोवन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कंपनीकडून दोन कि.मी.पर्यंत १० रुपये, दोन ते पाच किमी- २० रु., पाच ते आठ किमी – ३० रु. आणि आठ किमीच्या पुढील प्रवासासाठी ४० रु. आकारले जात आहेत. मात्र, समितीने यावर्षी ११ मार्च रोजी दिलेल्या अहवालात दोन किमीपर्यंत दहा रुपये, दोन ते पाच किमी- २० रु. पाच ते सहा किमी- २५ रु. सहा ते नऊ किमी- ३० रुपये आणि नऊ किमीच्या पुढील प्रवासासाठी ३५ रुपये आकारणी करण्याची शिफारस केली आहे. ‘हे दर बेस्ट परिवहनच्या सर्वसाधारण बसच्या दराच्या दीड पटीत आहेत. करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे हे दर पुढील चार वर्षे ठेवावेत’, अशी शिफारस निवृत्त न्यायमूर्ती आर. पी. सोंदुरबलदोटा यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय समितीने केली आहे. ‘मेट्रो तिकिटांव्यतिरिक्त होणाऱ्या महसुलात मागील चार वर्षांत भरीव वाढ झाली असली तरी त्यात आणखी वाढ करण्याचे मार्ग कंपनीला शोधणे आवश्यक आहे. यासंदर्भात सार्वजनिक हिताच्या दृष्टीने एमएमआरडीएही सहकार्य करेल. व्यावसायिक वापराच्या माध्यमातून अधिक महसूल मिळवण्याकरिता एमएमआरडीएशी सल्लामसलत करत अतिरिक्त जागाही कंपनीला शोधता येतील’, असेही समितीने अहवालात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *