चंद्रपुरातील वरोरा पोलीस ठाण्यातले हवालदार सुरेश बाबोले यांनी आज शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. मूळचे ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेले बाबोले यांची वर्षभरापूर्वी वरोरा या ठिकाणी बदली झाली होती. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी ब्रह्मपुरी या ठिकाणीच बदली मागितली होती. मात्र बदली होत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचललं. याच कारणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ते कामावर हजर झाले नव्हते.
शुक्रवारी ते कामावर हजर झाले. त्यानंतर आज म्हणजेच शनिवारी पहाटे त्यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेले एक पत्र पोलिसांना सापडले. ज्यामध्ये बदली होत नसल्याने आत्महत्या करतो आहे असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. वरोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी पाटील यांनी ही माहिती दिली. बाबोले यांच्यामागे त्यांनी पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
