रायगड जिल्ह्यात मासेमारीच्या अनेक बोटी कोळी समाजाच्या पण वर्चस्व परप्रांतीयांचे

रायगड जिल्ह्यात मासेमारीच्या अनेक बोटी कोळी समाजाच्या मालकीच्या असल्या, तरी या बोटी समुद्रात नेणे, जाळी हाताळणे, मासळी पकडणे आणि ती किनाऱ्यावर आणणे या कामांमध्ये उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यांतील परप्रांतीय कामगारांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे ‘बोटी स्थानिकांच्या; पण समुद्रावरील प्रत्यक्ष नियंत्रण परप्रांतीयांचे’ असे चित्र निर्माण होत आहे. भविष्यात स्थानिकांपेक्षा परप्रांतीयांचे वर्चस्व वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

१५ ऑगस्टनंतर मासेमारी हंगाम पुन्हा सुरू

शेती आणि मासेमारी हा रायगड जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. १५ ऑगस्टनंतर मासेमारी हंगाम पुन्हा सुरू झाला असून, बोटी समुद्रात जाऊ लागल्या आहेत. यंदा मासेमारीसाठी सुमारे २५ हजार पुरुष कामगार, तर मासळी वेगळी करणे, सुकवणे आदी कामांसाठी पाच हजार महिला कामगार जिल्ह्यात आल्याचे सांगण्यात येते.

बोटमालकांचे अनुभवी परप्रांतीय कामगारांवर अवलंबित्व

बोटीवरील तांडेलला दिवसाला सुमारे १५०० रुपये, तर अन्य कामगारांना सुमारे एक हजार रुपये मजुरी द्यावी लागते. त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची जबाबदारीही बोटमालकावर असते. डोली, पर्सनेट आणि एलईडी मासेमारीसाठी अनुक्रमे पाच, आठ आणि १५ किंवा त्यापेक्षा अधिक कामगारांची आवश्यकता भासते. त्यामुळे बोटमालकांचे अनुभवी परप्रांतीय कामगारांवर अवलंबित्व वाढत आहे.

तरुणांनी मासेमारी व्यवसायात यायला हवे

स्थानिक तरुण मासेमारी

व्यवसायापासून दूर जात असताना, परराज्यातील कामगार नाखवा म्हणून काम करणे, जाळी हाताळणे, खोल समुद्रातील मासेमारी यांसारखी कौशल्ये आत्मसात करत आहेत. काही ठिकाणी मासळीच्या लिलावातील हिस्सा या कामगारांना देण्यापर्यंत परिस्थिती पोहोचल्याचे सांगण्यात येते. ‘ कोळी समाज ातील सुशिक्षित तरुण वर्ग नोकरीला प्राधान्य देत आहे. मात्र या तरुणांनी मासेमारी व्यवसायात यायला हवे, अन्यथा हा व्यवसाय परप्रांतीयांच्या हातात जाईल,’ अशी भीती अखिल कोळी समाज परिषदेचे ॲड. जे. टी. पाटील यांनी व्यक्त केली.

वाढता खर्च आणि बाजारपेठेतील मध्यस्थ यामुळे मच्छीमार आधीच अडचणीत

कोल्ड स्टोरेजचा अभाव, मासळी साठवणुकीतील नुकसाण,इंधन व मजुरीचा वाढता खर्च आणि बाजारपेठेतील मध्यस्थ यामुळे मच्छीमार आधीच अडचणीत आहेत.त्यातच परप्रांतीय कामगारांवरील वाढते अवलंबित्व यावरून चिंता व्यक्त होत आहे. कोळी समाजाचा पारंपारिक व्यवसाय, त्यातील कौशल्य आणि पुढील पिढीचे भवितव्य स्थानिकांच्या हातात राहणार का ,हा प्रश्न आता गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे. आज किनाऱ्यावर बोट कोळी समाजाची आहे; मात्र उद्या ” बोटी तुमच्या, समुद्र आमचा”अशी वेळ येऊ नये, यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देणे, त्यांना मासेमारी व्यवसायात आणणे,आधुनिक सुविधा आणि कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तरच कोळी समाजाची पुढील पिढी मासेमारीच्या व्यवसायाकडे आकर्षित होऊ शकेल, अशी चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *