१० वर्षांपासून सुरू असलेले प्रेमसंबंध, त्यातून दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक असल्याचा संशय आणि त्यानंतर थेट हत्येचं टोक गाठणारा संताप भिंगार परिसरातील वडारवाडी येथे आज मंगळवारी सकाळी घडलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात काम करणाऱ्या ४२ वर्षीय अनिता देविदास आळकुटे यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष नाना धोत्रे (वय ४९) याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं आहे. प्रेमसंबंधांतून निर्माण झालेला संशय हे या हत्येमागील प्राथमिक कारण असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयातच रक्तरंजित थरार
आज मंगळवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ही घटना घडली. अनिता आळकुटे या ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी संतोष धोत्रे याने त्यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. डोक्यावर आणि गळ्यावर गंभीर वार झाल्याने अनिता यांचा मृत्यू झाला. ग्रामपंचायत कार्यालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलेची हत्या झाल्याचे समोर येताच वडारवाडीसह भिंगार परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.
१० वर्षांचे संबंध; दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक असल्याचा संशय
या प्रकरणात प्रेमसंबंधांची माहिती समोर आल्याने तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनिता आळकुटे आणि संतोष धोत्रे यांच्यात गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. धोत्रे याच्या पत्नीपासून तो वेगळा राहत असून, न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर अनिता यांचे पती वारलेले होते. अनिता यांचे अन्य एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याची माहिती धोत्रे याला मिळाल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याच संशयातून संतापलेल्या धोत्रे याने ग्रामपंचायत कार्यालयात अनिता यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. या हत्येमागील नेमके कारण, घटनेपूर्वी दोघांमध्ये काय घडले आणि हल्ल्याचे स्वरूप याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
मयत महिला मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या घटनेनंतर अनिता यांचा मुलगा योगेश आळकुटे (वय २६) याला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून त्याची फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. आरोपी संतोष धोत्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. ग्रामपंचायत कार्यालयात घडलेल्या या हत्येमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रेमसंबंधांतून निर्माण झालेला संशय एका महिलेच्या जीवावर बेतल्याची चर्चा सुरू असली, तरी हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. सध्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून परिस्थिती शांत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
