प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील सर्वात मोठी बातमी! अखेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची चौकशी होणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात अखेर शिवसेनेच्या माजी महापौर, विद्यमान नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांची पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी केली जाणार आहे. त्यांना आज, मंगळवारी चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती एसआयटीतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. यापूर्वी त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची एसआयटीने अनेकदा चौकशी केली आहे.

ठाण्यातील मानपाडा भागातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता त्यांच्याच कार्यालयात पिस्तुलातून गोळ्या झाडत आणि चॉपरने वार करत हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. तक्रारीमध्ये पूर्णेकर यांच्या हत्येमागे राजकीय, सामाजिक वाद कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेंवर पूर्णेकर कुटुंबियांचा गंभीर आरोप

ही हत्या पूर्वनियोजित कट रचून केल्याचे तक्रारींमध्ये उल्लेख असला तरी शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर पूर्णेकर कुटुंबीयांनी पहिल्यापासूनच गंभीर आरोप केले आहेत. शिंदे दाम्पत्याला आरोपी करण्याची मागणी केली असून प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांच्या पुरवणी जबाबात शिंदे दाम्पत्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. तर, मीनाक्षी शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

पोलिसांनी आधी पप्या शिंदेला केलेली अटक

या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीने सर्वात प्रथम पूर्णेकर यांचा जुना मित्र सुभाष उर्फ पप्या शिंदे याला अटक केली होती. त्यानंतर निखिल यादव, नितेश पवार यांना अटक करण्यात आली. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेत्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेत संशयित मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी केली होती. या सर्व घडामोडीत पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली होती.

राजेंद्र शिंदे यांची वारंवार चौकशी

मात्र, शिंदे दाम्पत्याची चौकशी कधी होणार? असा प्रश्‍न विरोधी पक्षातील नेते तसेच पूर्णेकर कुटुंबियांकडून वारंवार उपस्थित केला जात होता. तपास पथकाने अखेर राजेंद्र शिंदे यांच्याकडे चौकशी सुरू केली. चौकशीसाठी त्यांना वारंवार ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावण्यात येत होते. जेणेकरून महत्त्वाचे धागेदोरे मिळतील.

राजेंद्र शिंदे आणि आरोपींची समोरासमोर चौकशी

आरोपी आणि राजेंद्र यांची समोरासमोर देखील चौकशी करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात माझा कोणताच संबंध नसल्याचा दावा राजेंद्र यांनी चौकशीत केला होता. त्यांच्याकडे आतापर्यंत पोलिसांनी सातवेळा चौकशी केली आहे. त्यांच्या चौकशीनंतर मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलवले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *