मध्य रेल्वेची लोकल पकडायची, वेळेत इच्छितस्थळी पोहोचायचे आणि दिवसाचे काम मार्गी लावायचे, एवढीच माफक अपेक्षा घेऊन घराबाहेर पडलेल्या प्रवाशांच्या वाट्याला सोमवारी संताप, नैराश्य आणि हतबलता आली. कांजूरमार्ग येथील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे विस्कळित झालेली वाहतूक तातडीने पूर्वपदावर आणण्यात रेल्वेला अपयश आले. स्थानकांवरील अपुऱ्या उद्घोषणा, गाड्यांच्या वेळेबाबतचा गोंधळ आणि डब्यांमधील प्रचंड गर्दी यामुळे प्रवाशांचे हाल झाले. २० ते ३० मिनिटे उशिराने धावणाऱ्या गाड्यांचा प्रवास दोन ते तीन तासांवर पोहोचला.
या दुर्घटनांमुळे मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. अनेकांना रुळांवर उड्या घेऊन चालत जवळचे स्थानक गाठावे लागले. रेल्वेच्या धडकेत तिघांना प्राण गमवावा लागला. भांडुपजवळ एसी लोकलच्या धडकेत साहिल थिटे (२१) या तरुणाचा मृत्यू झाला. घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे स्थानकांदरम्यानही दोघांचा रेल्वेधडकेत मृत्यू झाला. विक्रोळी-घाटकोपरदरम्यान राहुल राजभर (२५) आणि खरबान राजभर (४०) यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तपशील मिळण्याची प्रतीक्षा आहे, असे रेल्वे पोलिस उपायुक्त प्रज्ञा झेडगे यांनी सांगितले.
