विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी होणार असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत मतपत्रिकांची अवाढव्य संख्या, वैध मतांच्या आधारे ठरणारा विजयाचा कोटा आणि पहिल्या पसंतीत निकाल न लागल्यास लागणारी पुढील पसंतिक्रमाच्या मतांची गरज, या बाबींवरच मोजणीचा कालावधी अवलंबून राहणार आहे; त्यामुळे अंतिम निकाल हाती येण्यासाठी किमान मध्यरात्र, किंबहुना उद्याचा दिवस उजाडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणास विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी आणि ‘महाऊर्जा’चे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांनी शिक्षक मतदार संघातील मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि सहआयुक्त संजय पलांडे यांनी पदवीधर मतदारसंघातील अधिकाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले.
