धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरात 18 वर्षीय समीर जब्बार पटेल या तरुणाची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी घडली. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष संतोष देविदास कदम ऊर्फ परमेश्वर आणि संजय विलास जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रणव देवकते, मस्के आणि अन्य दोन अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे. मुलीचा पाठलाग करून त्रास देत असल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
नेमकी घटना काय?
समीर हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी.कॉम प्रथम वर्षात शिकत होता. 3 नोव्हेंबर रोजी परीक्षा देऊन घरी परतल्यानंतर त्याला काही जणांनी सोबत नेले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. भारतीयबुवा मठाजवळील पार्किंग परिसरात तो जखमी अवस्थेत आढळला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेत त्याचा नातेवाईक अरबाज अफसर सय्यदही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
उर्वरित आरोपींचा शोध सुरु
समीरच्या आईच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संतोष कदम आणि संजय जाधव या दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. घटनेत वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहितीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.
पोलिसांनी काय सांगितलं?
धाराशिवचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पुंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण एका मुलीला त्रास देत असल्याची फिर्याद पोलिसांकडे आली होती. फिर्यादीमध्येही तसा उल्लेख आहे. या प्रकरणात मुलगा आणि मुलगी या दोन्ही बाजूंचे म्हणणे पोलिसांना मिळालं आहे. मुलीला त्रास देण्याच्या कारणावरून संबंधित तरुणाला यापूर्वी समजही देण्यात आली होती. मात्र, वारंवार असाच प्रकार घडत असल्यामुळे मुलीच्या बाजूचे नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींनी त्या तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
या प्रकरणात आतापर्यंत चार व्यक्तींची आरोपी म्हणून नावे समोर आली असून दोन अनोळखी व्यक्तींचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी तपास पथके रवाना करण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच मृत तरुण आणि त्याच्या मित्राला घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले असून त्या वाहनाच्या अनुषंगानेही तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
