पुण्यातील पायल झांबरे प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तोवर सांगलीतील शिराळा तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे प्रेमविवाह केलेल्या एका २४ वर्षीय तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आपल्याच आयुष्याचा शेवट केला आहे. तिने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जीवन संपवलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता मोठी कारवाई करत पतीसह सासू आणि सासऱ्याला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पूजा शिवम पाटील असं जीवन संपवणाऱ्या २४ वर्षीय विवाहित तरुणीचं नाव आहे. ती शिराळा तालुक्यातील पाडळी येथील रहिवासी होती. या प्रकरणी मृत पूजाचे वडील रवींद्र शामराव शिंदे (वय ५७, रा. शिराळा) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींना काल बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. शिवम सुरेश पाटील (पती), सुमित्रा सुरेश पाटील (सासू) आणि सुरेश खंदू पाटील (सासरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
‘लग्नात योग्य मानपान केला नाही’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा हिने शिवम पाटील याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, विवाहानंतर अवघ्या काही दिवसांपासून म्हणजेच ७ जून २०२३ पासूनच सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. ‘लग्नात योग्य मानपान केला नाही आणि नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आण,’ असा सततचा दबाव तिच्यावर टाकला जात होता. या सततच्या त्रासाला आणि अपमानाला वैतागून पूजा हिने २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. या भीषण आगीत ती गंभीरपणे भाजली, आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पायल झांबरे आत्महत्या प्रकरण
पुण्यातील मुकुंदनगर परिसरात विवाहित तरुणी पायल झांबरे यांच्या मृत्यू प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. दिवाळी सणाला घरून 10 तोळे सोनं घेऊन यावं, यासाठी त्यांच्या सासरच्यांकडून छळ सुरू होता. याच छळाला कंटाळून त्यांनी आपल्या सासरच्या कुटुंबाच्या जुन्या फ्लॅटमध्ये गळफास लावून जीवन संपवलं आहे. मृत्यूच्या आदल्या रात्री पायल यांनी आपल्या भावाला अखेरचा टेक्स्ट मेसेज केला होता. यानंतर त्यांचा फोन बंद झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
‘घरच्या भांडणात पडू नका’
पायल यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधी रात्री 9.18 मिनिटांनी तिने फिर्यादी भाऊ ऋषीकेशला मोबाईलवरून एक टेक्स्ट मेसेज पाठवला, ज्यामध्ये तिने ‘माझी सासू जबाबदार आहे’, असं लिहिलं होतं. भावाने ताबडतोब तिच्या फोनवर संपर्क साधला असता तिने फोन उचलला नाही. जेव्हा तिच्या पतीला फोन केला, तेव्हा त्याने उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे दिली आणि ‘घरच्या भांडणात पडू नका’, असं सांगून फोन कट केला.
