विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी ५१० रुपयांचा दंड भरल्यानंतर एका महिला प्रवाशाने पश्चिम रेल्वेच्या महिला तिकीट तपासनीसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. हरपीत कौर कामत असे टीसीचे नाव आहे. दंडाची पावती देताना प्रवाशाने टीसीच्या हाताला नखांनी ओरबाडत हाताचा चावा घेतला. हल्ल्यात महिला टीसी जखमी झाल्या आहेत. यामुळे रेल्वे स्थानकातील टीसीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पश्चिम रेल्वेमध्ये डेप्युटी चीफ तिकीट इन्स्पेक्टर या पदावर हरपीत कौर कार्यरत आहेत. त्या तिकीट तपासनीसाचे काम करण्यासाठी वांद्रे स्थानकातून बुधवारी विरार लोकलमध्ये चढल्या. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चर्चगेट दिशेकडील महिला द्वितीय श्रेणीच्या डब्यातील प्रवाशांचे तिकीट-पास तपासणी सुरू केली. पावणेआठ वाजण्याच्या सुमारास लोकल अंधेरी स्थानकात पोहोचली. तपासणीदरम्यान विनातिकीट असलेल्या प्रवाशांना अंधेरीतील फलाट क्रमांक सहावर उतरवण्यात आले.
हल्ला करणाऱ्या महिलेकडे तिकीट नव्हते. टीसी हरपीत यांनी नियमानुसार ५१० रुपये दंड भरण्याच्या सूचना केल्या. दरम्यान रोख रक्कम नसल्याचे सांगत महिलेने टीसीकडे क्यूआर कोडबाबच विचारणा केली. दोन वेळा क्यू आर कोड दिल्यावरही महिलेने दंडाची रक्कम भरली नाही, उलट पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिला पकडून फलाट क्रमांक सहा-सातवरील रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीत आणले. तिसऱ्यांदा क्यू आर कोड दिल्यावर चौकीत तिने दंड भरला. मात्र तिचा राग कायम होता. रागाच्या भरात महिलेने टीसी हरपीत यांना शिवीगाळ करत उजव्या खांद्यावर हाताने मारले. दरम्यान चौकीत उपस्थित आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.
हरपीत या पावती देत असताना महिलेने हरपीत यांच्या शर्टाला पकडून उजव्या हाताच्या तळव्यावर नखांनी ओरबाडले. त्याच हातावर जोरदार चावा घेत तेथून पळ काढला. उपस्थित आरपीएफ कर्मचाऱ्यांनी जखमी हरपीत यांना रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू केले. या प्रकरणी हरपीत यांनी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १२१(१) आणि ३५२ नुसार गुन्हा नोंदवला. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आणि ऑनलाइन पेमेंटच्या मदतीने पोलिसांकडून हल्ला करणाऱ्या महिलेचा शोध सुरू आहे.
रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांना आकारला जाणारा दंड दुप्पट अर्थात २५० वरून ५०० रुपये झाला आहे. यामुळे विनातिकीट प्रवासी आणि टीसी यांच्यातील वादाच्या घटना वाढल्या आहेत. वादात रागाच्या भरात प्रवाशांकडून टीसीवर हल्ले केले जात आहेत. प्रवासी ५०० रुपयांचा दंड भरण्यास तयार नसल्याने पळून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे टीसींची डोकेदुखी वाढली आहे.
