पाटणा- बिहारची राजधानी पाटणा येथील पासपोर्ट कार्यालयाबाहेर शुक्रवारी सकाळी दोन बाँबस्फोट झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. पासपोर्ट कार्यालयातील कर्मचा-यांची तर भीतीने गाळण उडाली. त्यानंतर येथे बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून कार्यालयाबाहेरील कचरा पेटीजवळ हे कमी तीव्रतेचे दोन बाँबस्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजीव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशियाना परिसरात हे दोन स्फोट झाले. या बाँबस्फोटांमुळे आजूबाजूच्या परिसराला चांगलाच हादरा बसला. काही घरांच्या आणि दुकानांच्या काचाही फुटल्या आहेत. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाँबनाशक आणि बाँब शोध पथक घटनास्थळी पोहचले असून ते कसून चौकशी करत आहेत. या ठिकाणी एक पिन सापडली आहे. त्यामुळे यामागे नक्षलवाद्यांचा हात असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतले होते, मात्र त्यांची चौकशी करुन त्यांना सोडून दिल्याचे पोलीस उप आयुक्त ममता कल्याणी यांनी सांगितले.
काही दिवसांपुर्वीच अगमकुआ परिसरातील एका एमआयजी घरात बाँबस्फोट घडवण्यात आला होता. त्यामध्ये नक्षलवाद्यांचा हात असल्याचे सांगण्यात आले होते.