अकरावीत शिकणाऱ्या छोट्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावानंच तिची मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडलीय.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या नुकतीच दहावीला 84 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. ओंकार अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. दोन वेळा नापास झाल्यामुळे त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आहे. ऐश्वर्याने अकरावीसाठी विवेकानंद कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. त्यांच्या घरातील तिसऱ्या मजल्यावर दोघांच्या अभ्यासाच्या खोल्या आहेत. ओंकारचे वडील जिल्हा बॅंकेत निरीक्षक म्हणून काम करतात. काही तरी घेण्याच्या कारणावरून ओंकार ऐश्वर्याच्या खोलीत गेला. खोलीची कडी लावून त्याने, “”तू कॉलेजमध्ये मुला-मुलींबरोबर का फिरतेस, फिट्ट कपडे का घालतेस, कॅंटीनमध्ये मुला-मुलींबरोबर असते, व्हॉटस्ऍपवरून चॅटिंग करतेस,‘‘ असे म्हणून मारहाण करण्यास सुरवात केली. खोलीचा दरवाजा बंद असल्यामुळे त्याचा आवाज बाहेर आला नाही. राग अनावर झाल्यामुळे त्याने पडद्यासाठी लावलेला रॉड काढून तिच्या डोक्यात मारला. यामुळे ती रक्तबंबाळ अवस्थेत कोसळली. ते बघून तेथून ओंकार आईकडे आला आणि ऐश्वर्याला मारल्याचे त्याने सांगितले. तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगितले. शेजारीच राहणारे नातेवाईक, स्वतः ओंकार आणि आईने ऐश्वर्याला गंभीर जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
गोंडस ओंकार गजाआड
ऐश्वर्याच्या अंत्यसंस्कारालाही ओंकारला पोलिसांनी सोडले नव्हते. त्यामुळे तो लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या कस्टडीतच होता. त्याचा अंगावरील ड्रेस आणि गोंडस चेहरा पाहिल्यावर त्याने सख्ख्या बहिणीचा खून केला आहे, असे अजिबात वाटत नव्हते. बहिणीला का मारलेस, अशी विचारणा केल्यावर उभा राहून उत्तरे देणारा ओंकार निराश होऊन खाली बसला. त्याने काहीच उत्तर दिले, त्याचे डोळेही पाणावले होते.
वडिलांना रुग्णालयात दाखल केले
घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यावर वडील घरी आले. ऐश्वर्याला पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे तातडीने त्यांना फॅमिली डॉक्टरांकडे दाखल केले. ऐश्वर्या मृत झाल्याचे त्यांना सकाळी अंत्यविधीला आणतानाच सांगण्यात आले. खुद्द डॉक्टरांनी सुमारे वीस मिनिटे त्यांच्याशी चर्चा करून त्यांना ऐश्वर्याची माहिती दिली.

