दहा रुपयांचा मोह महागात

‘टकटक’ टोळी ठाण्यातही सक्रिय झाली आहे. गाडीची काच ठोठावत रस्त्यावर दहा रुपयांच्या नोटा पडल्याचे सांगून गाडीमधील व्यक्तीला गाडीमधून खाली उतरण्यास भाग पाडले. तितक्यात गाडीमधील पैसे आणि अन्य वस्तू असलेली बॅग या टोळीने लांबवल्याचा प्रकार नौपाडा परिसरात घडला आहे. चौघांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीतील संदीप ठाकरे काही कामानिमित्त शनिवारी ठाण्यात गाडीने आले होते. सोबत त्यांचे मित्रही होते. काम आटोपल्यानंतर रात्री ८.३० वाजता सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी ते गोखले रोड येथे आले. दागिन्यांच्या खरेदीसाठी गाडीमधून मित्र उतरले. मात्र गोखले रोडवर वाहतूककोंडी झाल्याने ठाकरे यांनी गाडी गावदेवी परिसरात पार्क केली आणि मित्रांची प्रतीक्षा करत ते गाडीतच बसले होते. तितक्यात एका व्यक्तीने गाडीची काच ठोठावल्याने त्यांनी काच खाली केली. त्यावेळी या व्यक्तीने तुमचे पैसे गाडीच्या खाली पडले असल्याचे ठाकरे यांना सांगितले. त्यांनी गाडीमधून पाहिले असता रस्त्यावर १० रुपयांच्या एकूण १२ नोटा पडल्याचे दिसून आले. ठाकरे गाडीतून बाहेर आले आणि नोटा उचलून गाडीत बसले. त्याचदरम्यान गाडीमधील पैशांची बॅग गायब झाली होती. ठाकरे यांना बोलण्यात गुंतवून गाडीच्या डाव्या बाजूला उभे असलेल्या तिघा आरोपींनी ही बॅग लंपास केली होती. या बॅगेत ८० हजारांची रोकड आणि घड्याळ आदी मुद्देमाल होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *