दोन चिमुरड्यांवर पुण्यात बलात्कार

साडेतीन आणि साडेचार वर्षे वय असलेल्या दोन सख्ख्या बहिणींवर एका ५४ वर्षीय व्यक्तींने बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात घडली. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला कोथरूड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पीडित मुलींच्या आईने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रभाकर भिका गिरजे (वय ५४, रा. सुतारदरा, कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आपल्या कुटुंबासह सुतारदरा परिसरात राहतात. फिर्यादी घरकाम करतात, तर त्यांचे पती खासगी नोकरी करतात. आरोपी हा प्लंबिंगची कामे करतो. फिर्यादी सकाळी साडेआठ वाजता कामाला गेल्यानंतर दुपारी तीन वाजता घरी परत येतात. या दरम्यानच्या वेळात आपल्या मुलींना जवळच राहणाऱ्या आत्याकडे सोडतात. मंगळवारी (१९ मार्च) फिर्यादी नेहमीप्रमाणे त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलींना आत्याच्या घरी सोडून कामाला गेल्या होत्या. आरोपी फिर्यादी यांच्या आत्याच्या घराशेजारी राहतो. आत्याच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपीने दोन्ही मुलींवर बलात्कार केला; तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली. ‘दोन्ही पीडित मुलींची ससून रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे,’ असेही जोशी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *