प्रेम नाकारुन आपला अपमान करणाऱ्या मैत्रिणीची अल्पवयीन मित्राने हत्या केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. तेव्हा तो 14 वर्षांचा होता आणि ती 11 वर्षांची. दोघेही शिकवणीच्या निमित्ताने रोज भेटत होते. यादरम्यान मुलगा मैत्रिणीच्या प्रेमात पडला आणि तिला प्रपोज केला. मुलीने शिक्षिकेकडे यासंबंधी तक्रार केली. हा विषय तेव्हाच संपला असं सर्वांना वाटत होतं. मात्र तसं झालेलं नव्हतं कारण मुलगा आपला अपमान विसरला नव्हता.
मुलगा सतत मैत्रिणीकडे माफी मागत होता ज्यानंतर मुलीने त्याला माफ केलं आणि त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली. दोघे एकमेकांना भेटूही लागले होते. मात्र यावेळी मुलाच्या डोक्यात काय सुरु आहे याची त्या मुलीला कल्पना नव्हती. मुलाने मैत्रिणीचं अपहरण करुन तिची हत्या करत कुटुंबाकडून पैसे मिळवण्याचा कट आखला होता.
एका संध्याकाळी दोघे चित्रपट पाहण्यासाठी गेले. चित्रपट पाहून झाल्यानंतर मुलाने अजून थोडा वेळ आपल्यासोबत घालवण्याची विनंती केली. मुलगा मैत्रिणीला एका निर्माणधीन इमारतीत घेऊन गेला. तिथे त्याने सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून मैत्रिणीला पाजलं. मैत्रीण बेशुद्ध होताच त्याने तिचे हात, पाय, तोंड बांधलं आणि डोक्यावर वार करुन हत्या केली.
हत्या केल्यानंतर मुलगा आपल्या घरी गेला. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मोबाइल स्विच ऑफ लागत असल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. ’14 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्च ऑपरेशन सुरु केलं. अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करत तपास सुरु करण्यात आला होता’, अशी माहिती डीसीपी मेघना यादव यांनी दिली.
पोलिसांनी मोबाइल रेकॉर्डच्या सहाय्याने संबंधित परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. कॉल रेकॉर्ड तपासले असता पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. महत्त्वाचं म्हणजे आरोपी मुलानेही न घाबरता आपण भेटलो होता, पण आईस्क्रिम खाऊन झाल्यानंतर आपण घरी परतलो असल्याचं सांगितलं. पण तो खोटं बोलत असल्याचं अखेर निष्पन्न झालं.
पोलिसांनी चौकशी केली असता आपण आपला अपमान विसरु शकत नव्हतो, त्यामुळेच हत्येचा कट रचला असं सांगितलं. आरोपी मुलाने पोलिसांनी हत्या केलेल्या ठिकाणी नेलं. त्या ठिकाणी मृतदेह पडून होता. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर काही तासांतच गुन्ह्याचा उलगडा झाला.
