नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करीत असलेल्या पोलीस नायकाला भरधाव कारने धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. शनिवारी मध्यरात्री आरमोरीजवळ ही घटना घडली. केवलराम हिरामण येल्लोरे (३८), रा. गणेशपूर, ता. आरमोरे असे मृत पोलिसाचे नाव आहे.
आरमोरी-गडचिरोली मार्गावरील सोनू धाब्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू होती. येथे आरमोरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी येल्लोरे हे कर्तव्यावर होते.
रात्री दीडच्या सुमारास येल्लोरे हे एका ट्रकची तपासणी करीत असताना मोरेश्वर हेडाऊ याच्या भरधाव कारने येल्लोरे यांना चिरडले. पोलिसांनी कारचालक मोरेश्वर हेडाऊ याला ताब्यात घेतले. आरमोरी पोलिसांनी आरोपी कारचालक मोरेश्वरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
