तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालणाऱ्या माजी सरपंचास शिक्षा

वाळूतस्करी रोखण्यासाठी आलेले तहसीलदार व पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळूचा ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणातील गुन्ह्यात कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील माजी सरपंचासह दोघांना दहा दिवसांची कैद व प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी सोमवारी हा निकाल दिला.

माजी सरपंच श्रीकांत उर्फ राजू चंद्रकांत भोसले (वय ४४), हनुमंत शंकर कुतवळे (वय ४२) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. जामखेड तालुक्यातील चौंडी गावाजवळील सिना नदीपात्रात सुरू असलेली वाळूतस्करी रोखण्यासाठी जामखेडचे तत्कालीन तहसीलदार विजय कुलांगे, नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस कर्मचारी हे कारवाईसाठी गेले होते. नदीपात्रातून वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा तहसीलदार व इतरांनी पाठलाग केला. नदीजवळच ट्रक्टरचालक वाळूने भरलेली ट्रॉली सोडून ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. काही वेळाने वीस ते पंचवीस जण ट्रॉली जवळ आले. तर ट्रॅ्क्टरचालक ट्रॅक्टर घेऊन आला. त्यावेळी आरोपी श्रीकांत भोसले याने ट्रॅक्टर चालक हनुमंत कुतवळे याला ट्रॅक्टरला ट्रॉली जोडण्यास सांगितले. त्यावेळी तहसीलदार कुलांगे व पोलिस कर्मचारी धांडे हे ट्रॅक्टरसमोर उभे राहिले. त्यांना श्रीकांत भोसले याने धक्काबुक्की केली. त्यानंतर ट्रॅक्टरचालकाला तहसीलदार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यास सांगितले. ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर तहसीलदार व पोलिस कर्मचारी धांडे यांच्याकडे चालवत नेला. दोघे बाजूला झाल्यानंतर चालक ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. याप्रकरणी तहसीलदार कुलांगे यांच्या फिर्यादीवरून माजी सरपंच भोसले व ट्रॅक्टरचालक कुतवळेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या खटल्याच्या सुनावणीत आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना शिक्षा ठोठाविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *