राजीव गांधी जीवनदायी योजना ठरली त्यांच्यासाठी पुनर्जन्मच

हृदयविकाराने त्रस्त असलेल्या सावंतवाडी- माठेवाडा येथील भारती बसवेश्वर प्रसादी यांना एनजीओप्लास्टी शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, एवढी महागडी शस्त्रक्रिया करणे त्यांच्यासाठी मुश्किल होते.

याचवेळी कुणीतरी त्यांना जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना भेटण्याचा सल्ला दिला. मसुरकर यांनी त्यांच्या नातेवाईकांना धीर देत राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत शस्त्रक्रिया होऊ शकते याची माहिती दिली. त्यानंतर मसुरकर यांच्या सहकार्याने कोल्हापूर येथील ‘अस्टर आधार’ रुग्णालयात भारती यांच्यावर यशस्वी एनजीओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेबरोबरच प्रवास व इतर खर्चही मोफत करण्यात आला. यामुळे भीतीने ग्रस्त झालेल्या या भारतीताईंना या योजनेमुळे जणू पुनर्जन्मच लाभला.

भारती प्रसादी यांच्या नातेवाईकांनी राजू मसुरकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मसुरकर यांनी त्यांना या योजनेची माहिती दिली. त्यामुळे २ ते ३ लाख रुपये खर्चाची ही महागडी शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात आली. त्यामुळे गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतल्यास इतरही अनेक रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकतो. खाजगी रुग्णालयातून उधारउसनवारी करून लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया करणे म्हणजे गोरगरिबांसाठी अग्निदिव्यच ठरते.

राजू मसुरकर यांच्या प्रयत्नातून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत दीड ते अडीच लाखांपर्यंतचे मोफत उपचार अनेक सर्वसामान्य रुग्णांना मिळाले आहेत. यासाठी पिवळे व केशरी रेशनकार्ड, मतदानकार्ड तसेच आधारकार्डाची आवश्यकता असते. हृदयविकाराबरोबरच कॅन्सर, मणक्याची शस्त्रक्रिया, फुप्फु साची शस्त्रक्रिया, हाडांची शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, मुतखडा, थायरॉईड वगैरे आजारावर मोफत उपचार केले जातात. याचा लाभ घेण्यासाठी तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल फ्री नं. १८००२३३२२०० किंवा १५५३८८, ९४२२४३५७६०, ८९७५८५७७१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राजू मसुरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *