१९९३ मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनला देण्यात आलेली फाशी म्हणजे कायदेशीर हत्या असल्याचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलने म्हटले आहे. तसेच भारताला या फाशीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्याने इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिला.
याकूबचा विश्वासघात करुन सरकारने दाऊद आणि त्याच्या सहका-यांना भारतात परत येण्याचा मार्ग बंद केला आहे. दाऊद भाई जर भारतात परत येतील त्याच्याबाबतीतही असेच घडेल, असे शकील म्हणाला. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दाऊद इब्राहिम आणि याकूबचा भाऊ टायगर मेमन आरोपी आहेत. त्या दोघांनी या हल्ल्याचा कट रचला होता.
भारत सरकारने ही फाशी देऊन कोणता संदेश दिला? तुम्ही एका निरपराध्याला त्याच्या भावाने केलेल्या कृत्याची सजा दिली. डी कंपनी याचा निषेध करते. ही कायदेशीर हत्या आहे. भविष्यात सरकाच्या कोणत्याही आश्वासनांना डी कंपनी बळी पडणार नाही, असे शकीलने सांगितले.
याकूबच्या भारतात परतण्याबाबत शकील म्हणाला, याकूबच्या कुटुंबाचा व्हिसा दुबईचा होता. त्याने आपल्या कुटुंबाला बोलावले आणि समर्पण केले. कोणासाठी? या फाशीने तुम्हाला काय मिळाले. काय बदलले याने? कोणी काय केले आणि तुम्ही त्याची शिक्षा त्याच्या भावाला दिली.

