कोलमडलेली सुरक्षा व्यवस्था व गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे हल्ला झाल्याची टीका करत सोमवारी कॉंग्रेसने या हल्ल्याबद्दल केंद्र सरकारला लक्ष्य केले होते. तर आज (मंगळवार) पंजाब सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. याबाबत बोलताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे लोकसभेतील उपनेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मंगळवारी हल्ल्यातील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच हुतात्मा झालेले पोलिस निरीक्षक बलजित सिंह यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, हल्ल्याच्या 10 दिवस आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांनी राज्य सरकारला संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत दिलेल्या माहितीकडे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला. गुरुदासपूर जिल्ह्यातील दिनानगर येथे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले. तर सहा जणांचा मृत्यू झाला.
‘गुप्तचर संस्थांची माहिती फेकली कचरापेटीत’
पंजाब सरकारने दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर संस्थांकडून मिळालेली माहिती कचरा पेटीत फेकल्याचा आरोप कॉंग्रेसने केला असून दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी राबविण्यात आलेली मोहिमही फारशी प्रभावी नसल्याचा आरोपही केला आहे.
