याकूबला फाशी द्याच, बॉम्बस्फोट पिडीतांच्या कुटुंबियांची मागणी

याकूबला फाशी द्याच, बॉम्बस्फोट पिडीतांच्या कुटुंबियांची मागणी

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनला फाशी देऊ नये अशी मागणी समाजातील काही प्रतिष्ठीतांनी केलेली असताना बॉम्बस्फोट पिडीतांच्या कुटुंबियांनी याकूबला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे.

याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी व्हावी यासाठी बॉम्बस्फोट पिडीतांच्या नातेवाईकांनी बुधवारी स्वाक्ष-यांचा एक अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला.

मुंबई बॉम्बस्फोटात आपल्या आईला गमावणा-या तुषार देशमुख यांनी याकूबला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी विधान भवन परिसरात केली. १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रत्यक्ष झळा सोसणा-या कुटुंबातील १६०० सदस्यांच्या या अर्जावर स्वाक्ष-या आहेत.

फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी याकूबने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठामध्ये सध्या या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत विविध ठिकाणी बारा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटामध्ये २५७ जणांचा मृत्यू झाला तर, ७०० हून अधिक जखमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *