याकूबला उद्या फाशी देणार

मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील गुन्हेगार याकूब मेमनला उद्या सकाळी सात वाजता फाशी देण्यात येणार आहे. दोषी याकूब मेमनचा दया अर्ज सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही फेटाळून लावला.

तसेच याकूबला बजावण्यात आलेले डेथ वॉरंट हे कायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असून कायदेशीर सर्व बाबी पाळल्या गेल्याने क्‍युरेटिव्ह पिटीशनवर पुन्हा सुनावणी होणार नाही, असे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता याकूब मेमनला उद्या सकाळी सात वाजता फाशी देण्याचे नक्की झाले आहे. नागपूर कारागृहात याकूबच्या फाशीची तयारी पूर्ण झाली आहे.

याकूब मेमन याची बुधवारी वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या वैद्यकीय चाचणीत याकूब फाशी देण्यासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासंदर्भात पोलीस महासंचालक संजीव दयाळ आणि पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

दरम्यान, अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगींच्या युक्तीवादावर याकूबचे वकील रामचंद्रन यांनी युक्तीवाद केला. यात डेथ वॉरंट बजावताना योग्य नियमांचे पालन करण्यात आलेले नाही, असा आक्षेप याकूबने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत घेतला होता. क्‍युरेटिव्ह याचिकेची सुनावणी होण्यापूर्वीच डेथ वॉरंट बजावण्यात आल्याचा दावाही त्याने केला होता. या मुद्‌द्‌यावर त्याने फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तसेच गेली २० वर्षे तुरुंगवास भोगला असल्याने फाशी रद्द करावी, अशीही त्याची मागणी होती. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने त्याची क्‍युरेटिव्ह याचिका फेटाळली होती.

त्यानंतर डेथ वॉरंटविरोधात याकूब मेमन याने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती ए. आर. दवे आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे ही याचिका सरन्यायाधीश एच. एल.  दत्तू यांनी न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती प्रफुल्ल पंत आणि न्यायमूर्ती अमिताव रॉय यांच्या वरिष्ठ खंडपीठाकडे पाठविली होती. यावर आज सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ खंडपीठाने याकूबला बजावण्यात आलेले डेथ वॉरंट हे कायदेशीर असल्याचे सांगून यावर पुन्हा सुनावणी होणार नाही, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *