पेण शहराच्या प्रवेशद्वारावरच स्वागताला मोठमोठे खड्डे

पेण शहराच्या प्रवेशद्वारावरच स्वागताला मोठमोठे खड्डे

मुंबई-गोवा महामार्गावरील पेण हे मुख्य शहर, मात्र शहराच्या प्रवेशद्वाराजवळच वाहनचालकांचे स्वागत मोठमोठे खड्डय़ांनी होते. अनेक वर्षापासून हे खड्डे या रस्त्यावर आहेत. हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी कुणाची यावरून पेण नगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग विभागात टोलवाटोलवी सुरू आहे.

पेण हे रायगड जिल्ह्याचे केंद्र असून मुंबईहून कोकणात येण्याजाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या मार्गावर एसटी बसेसचीही मोठी येजा असते. पेण ही गणेश मूर्तीची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी दररोज कृषी उत्पन्न बाजार समितीचा सकाळी मोठा बाजार भरत असल्याने सातारा, पुणेसह पेण तालुक्यातील अनेक शेतकरी व दुकानदार या ठिकाणी भाजी, कडधान्यांच्या खरेदी-विक्री साठी येत असतात.

तसेच प्रवेशद्वाराच्या शेजारी महामार्गालगत पेण रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे पेण शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पेणमध्ये मुंबई-पुणे-गोवा-अलिबाग-कोकण आदी मार्गाकडून वाहने येत असल्यामुळे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक वाहनांचे छोटे मोठे अपघात होत असून खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी होते.

गणेशमुर्तीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या पेण शहरात गणेशमूर्ती खरेदीसाठी मुंबई, नागपुर, कोल्हापुर, गुजरात गोवा, सिंधुदुर्ग, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांसह परदेशातून कारखानदार रंग व कच्च्या गणेशमूर्ती खरेदी करून घेऊन जात आहेत. त्यांनासुद्धा या पेण प्रवेशद्वाराच्या खड्डय़ांना सामोरे जावे लागत आहे.

पेण नगरपालिका किंवा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यापैकी कुणीही या खड्डय़ांची जबाबदारी घ्यायला तयार नाही.

गणेशोत्सवापूर्वी रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील महामार्ग, जिल्हामार्ग, तालुकामार्ग व ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सरकारने आदेश दिले आहेत. असे असताना संबंधित खात्यांकडून रस्त्यांची दुरुस्ती का होत नाही, असा प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *