रायगड जिल्ह्यातील पेण हे गणेश मूर्तीचे माहेरघर, येथील गणेशमूर्तीना मागणी वाढत आहे. गणेशमूर्ती साकारण्याच्या या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. श्रीगणेशाचे वाहन मूषक साकारताना गतीमंद विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून आश्चर्यचकीत व्हायला होते.
पेणमधून गणेशमूर्ती देशपरदेशात पाठवल्या जातात. ही उलाढाल कोटय़वधींची असते. सध्या सर्वच मूर्तीशाळेतील कारागीर हात मूर्ती साकारण्याच्या कामात गुंतले आहेत. या श्रीगणेशाचे जेवढे महत्त्व असते तसेच गणेशाच्या मूषकाचेही महत्त्व असते.
गणेशमूर्तीजवळ मूषकाचे स्थान हक्काचे असते. हा मूषक साकारण्याचे काम पेणमधील आई डे केअर या संस्थेतील विद्यार्थी करताहेत. विद्यार्थ्यांचे कौशल्य व रोजगार तसेच त्यांच्या बुद्धीला चालना देण्याचे काम या मूषकनिर्मितीतून होत आहे. या गतीमंद विद्यार्थ्यांनी यंदा १० हजार मूषक साकारले आहेत. ते विविध गणेशकार्यशाळांमध्ये नेण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३२ प्रौढ आणि इतर विद्यार्थी या संस्थेत शिकत आहेत. कागदाच्या फाईल्स, राख्या, पणत्याही ही मुले साकारतात. नुकतीच वारली चित्रांची पाच लाख रुपयांची ऑर्डर या मुलांनी पूर्ण केली आहे. या कामातून विद्यार्थ्यांना रोजगारही मिळतो तसेच त्यांचे कौशल्यही पणाला लागते. आमच्या संस्थेतील मुले कौशल्याची लहानसहान कामे करतात. त्यातून मिळणारी रक्कम संस्था खर्च करत नाही. याच विद्यार्थ्यांना त्यांचे मानधन दिले जाते.
या गतीमंद विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून सक्षम करण्यासाठी हे प्रयत्न केले जातात, असे संस्थेच्या संचालिका स्वाती मोहिते यांनी सांगितले.

