सध्या आपल्याला सगळीकडेच सरकते जिने (एस्केलेटर) पाहायला मिळतात. अनेकांना जिने चढण्याचा त्रास असतो अशावेळी एस्केलेटर हे फारच आरामदायी वाटतात. मात्र, याच एस्केलेटरमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
चीनमधील जिंगहोऊ शहरातील एका मॉलमध्ये एक विचित्र अपघात झाला. मॉलमध्ये आलेली एक महिला आपल्या छोट्या मुलाला घेऊन एस्केलेटरवर चढली. हळूहळू एस्केलेटर वर येऊ लागलं. शेवटच्या टप्प्यात एस्केलेटर आल्यानंतर अचानक यातील एक प्लेट निसटली आणि काही क्षणांमध्ये ही महिला त्यात अडकली. काही समजण्यापूर्वीच ती त्यात घट्ट अडकून बसली. यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मात्र, महिलेने स्वत: अडकण्यापूर्वी आपल्या मुलाला पुढे ढकलून दिलं. जेणेकरुन त्याचा जीव वाचला. मात्र, ती एस्केलेटरच्या आत अडकली.
एस्केलेटरमध्ये महिला अडकल्यानंतर तिथे उभ्या असणाऱ्या मॉलमधील कर्मचाऱ्यांनी तिला बाहेर काढण्याचा अतोनात प्रयत्नही केला. मात्र त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाही. याप्रकरणी मॉल प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नसून स्थानिक एजन्सी या घटनेची चौकशी करीत आहे.

