कानपुरात घरकाम करुन उदरनिर्वाह करणारी एक महिला एका रात्रीत अब्जाधीश झाली. उर्मिला नामक महिलेच्या स्टेट बँकेच्या खात्यात अचानक 9,57,11,69,86,47,130.14 म्हणजेच सुमारे 95,711 अब्ज रुपये जमा झाल्याचं लक्षात आल्याने तीही अवाक झाली.
कानपूरमधील विकासनगर भागात राहणाऱ्या उर्मिलाला बँकेकडून इतकी मोठी रक्कम खात्यात जमा झाल्याचा एसएमएस आला. मेसेज वाचून तिचाही तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिने तडक बँकेत धाव घेत ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. आकडे पाहून बँक कर्मचारीही अचंबित झाले होते.
उर्मिलाने जन धन
योजनेअंतर्गत एसबीआयच्या विकासनगर शाखेत सेव्हिंग्ज अकाऊण्ट उघडलं होतं. या खात्यात तिने दोन हजार रुपये जमा केले होते. उर्मिलाच्या खात्यातील रक्कम ही बिल गेट्स, मुकेश अंबानी, लक्ष्मी मित्तल यांच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही अधिक आहे.
चौकशी केली असता किमान बॅलन्स नसल्यामुळे काल्पनिक रक्कम उर्मिलाच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याचं बँकेतर्फे सांगण्यात आलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी चूक सुधारली आणि उर्मिलाच्या खात्यात तिने जमा केलेल्या दोन हजार रुपयांची रक्कम दिसू लागली.

