ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्ध दुसरा आणि शेवटचा अनधिकृत कसोटी सामना बुधवारी सुरू होत असून, पहिला सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही विजय मिळविण्यास उत्सुक असलेल्या कर्णधार विराट कोहलीकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
आव्हानात्मक श्रीलंका दौऱयाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धात्मक सामन्यांचा महत्त्वपूर्ण सराव करण्यासाठी कोहली काल थेट सराव सत्रात सहभागी झाला. चेन्नई आणि कोलंबोमधील वातावरणात साम्य आहे, त्यामुळे या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कोहलीने सराव सत्रात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघ श्रीलंकेमध्ये 12 ऑगस्टपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणाऱ्या या कसोटी मालिकेमध्ये विराट कोहली प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे सध्या तो स्पॉटलाइटमध्ये आहे.

