भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (वय ८३) यांचे शिलाँग येथे सोमवारी निधन झाल्यानंतर आज (मंगळवार) त्यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले आहे. आज सायंकाळी रामेश्वरम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
शिलाँग येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या (आयआयएम) कार्यक्रमासाठी ते गेले होते. व्याख्यान सुरू असतानाच ते व्यासपीठावर कोसळले. त्यांना तातडीने बेथानी रुग्णालयात नेण्यात आले; पण त्यांची प्राणज्योत मालविली. डॉ. कलाम यांच्या निधनामुळे सात दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज सकाळी त्यांचे पार्थिव शिलाँगहून गुवाहाटी येथ आणण्यात आले. तेथून त्यांचे पार्थिव हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीत नेण्यात आले. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर तमिळनाडूतील रामेश्वरम या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गुवाहाटी येथे कलाम यांच्या पार्थिवावर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. कलाम यांच्या निधनानंतर देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

