डॉ. कलाम यांचे पार्थिव दिल्लीकडे रवाना

डॉ. कलाम यांचे पार्थिव दिल्लीकडे रवाना

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे सोमवारी संध्याकाळी शिलाँगमध्ये निधन झाले. विशेष विमानाने त्यांचे पार्थिव गुवाहाटीवरुन दिल्लीला आणण्यात येत आहे. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दुपारी तीन वाजल्यानंतर दिल्लीत सर्वसामान्य जनतेला डॉ. कलाम यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला ठेवण्यात येणार आहे.

सकाळी सव्वासहाच्या सुमारास शिलाँगहून हवाईदलाच्या विमानाने गुवाहाटीला कलाम यांचे पार्थिव आणण्यात आले.कलाम यांचे पार्थिव गुवाहाटीला आणल्यानंतर मेघालयचे राज्यपाल व्ही.शानमुघनाथन यांनी श्रद्धांजली वाहिली. कलाम यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

कलाम यांच्या निधनाने देशाचे न भरुन येणारे नुकसान झाल्याची भावनिक प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी दिली. कलाम यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना लहान मुले खूप आवडत. आसामच्या ग्रामीण भागात मी अनेकदा त्यांना घेऊन गेलो. कलाम यांचे व्यक्तिमत्व अतिशय साधे आणि प्रामाणिक होते, असे गोगोई म्हणाले.

माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंता यांनीही कलाम यांना आदरांजली वाहिली. लोकांचे राष्ट्रपती गेल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सोमवारी संध्याकाळी कलाम शिलाँगमधील आयआयआयएममध्ये जाहीर कार्यक्रमात भाषण करत अचानक कोसळले. त्यांना तातडीने बेथनाय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी कलाम यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *