मुंबईतील 1993 साखळी स्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याचं कुटुंब पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आलं आहे. बॉम्बस्फोटानंतर याकूब सरेंडर करण्यासाठी आला होता आणि फाशी होणार नाही असा त्याला विश्वास होता, असं म्हणत कुटुंबियांनी त्याची फाशी रद्द करण्याची मागणी केली.
याकूबचा 1993 च्या साखळी स्फोटांशी काहीही संबंध नाही, असा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. याकूबची पत्नी राहिन मेमन आणि त्याच्या कुटुंबियांनी याबाबत संवाद साधला.
काही दिवसांपूर्वी याकूबच्या पत्नीने त्याची नागपूर जेलमध्ये भेटली होती. या भेटीनंतर ती म्हणाली होती की, न्यायालयाकडून खूप अपेक्षा आहे. क्युरेटिव्ह पीटिशनच्या वेळीही फार अपेक्षा होता. ते म्हणाले की, मी निर्दोष होतो आणि आहे.
जे होतंय ते चुकीचं आहे. त्यांनी शरणागती पत्करली होती, याचा अर्थ त्यांनी काहीही चुकीचं केलं नव्हतं. मुंबई स्फोटाची बातमी मला टीव्हीवर समजली, असंही याकूबची पत्नी राहीन म्हणाली.
राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना आवाहन करते की,माझ्या पतीला माफ करा, मी, माझी मुलगी आणि पतीने खूप भोगलं आहे. आम्हाला भारताच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे.
याकूबची मुलगी झुबैदा मेमनने सांगितलं की, ‘मी फक्त 25 दिवसांची होती, जेव्हा मी भारतात आले. मला नेहमीच वडिलांची आठवण येते. मला त्यांच्यासोबत राहता येईल, याची मी आजही वाट पाहते.
याकूबचा मित्र उस्मान यांनी सांगितलं की, याकूब सरेंडर करण्यासाठी नेपाळला आला होता. पोलिसांनी तिथूनच त्याला पकडलं. याकूबजवळ पाकिस्तानविरुद्धच्या ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरुपातील पुरावेदेखील होते. याकूब पूर्णत: निर्दोष आहे.

