केंद्र सरकारनं इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत जाहीर केल्यापासून हजारो करदात्यांच्या मेल बॉक्समध्ये एक मेल थडकतो आहे. इन्कम टॅक्सचा परतावा मिळवण्यासाठी तुमच्या नेट बँकिंगचा तपशील खालील संकेतस्थळावर अपलोड करा, असं आवाहन मेलद्वारे करण्यात येत आहे. व्हॉट्सअॅपवरही असेच मेसेज येत आहेत. मात्र, ही वेबसाइट व मेसेज बनावट असून याद्वारे अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
करदात्यांकडं त्यांच्या नेट बँकिंगचा तपशील मागणाऱ्या वेबसाइटचा पत्ता incometaxindiafilling.gov.in असा आहे. तर, आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in ही आहे. दोन्ही वेबसाइटच्या नावात बरंच साम्य असल्यामुळं नागरिकही या फसवणुकीला बळी पडत आहेत. मात्र, बारकाईनं पाहिल्यास या दोन्ही वेबसाइटमध्ये एक छोटा, तरीही महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे त्यातील efilling हा शब्द. बनावट वेबसाइटमध्ये हा शब्द filling असा आहे.
व्हॉट्सअॅपवरही अशाच प्रकारचा एक मेसेज फिरत आहे. ‘ज्या करदात्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले आहेत त्यांच्यासाठी सूचना… तुम्ही अधिकचा टॅक्स भरलेला आहे. परतावा रक्कम परत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा,’ अशा आशयाचा हा मेसेज आहे. त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करताच नेट बँकिंगचं लॉग इन पेज सुरू होतं आणि एखाद्यानं त्यात लॉग इन केलं की त्याचं बँक अकाउंट हॅक केलं जातं. ‘अशा इ-मेल व मेसेजेसकडे साफ दुर्लक्ष करा. नेट बँकिग वा क्रेडिट कार्डचा तपशील कुणाशीही शेअर करू नका,’ असं आवाहन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.
अंतिम मुदत निघून गेल्यानंतरही तुम्ही रिटर्न फाइल केलं नसेल तर आयकर विभागाकडून तुम्हाला रीतसर नोटीस बजावण्यात येते. आयकर विभागाकडून करदात्यांना कधीही फोन केला जात नाही. नागरिकांनी हे लक्षात ठेवावं, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.