रविवारी मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने शुक्रवारी पुन्हा एकदा मधूनच जोरदार कोसळत मुंबईकरांना आपले अस्तित्व दाखवून दिले. शनिवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, रविवारी प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार सोमवारीही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे रविवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. मंगळवारी मुंबई आणि रायगड येथील परिस्थितीमध्ये थोडा बदल होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीनुसार मंगळवारी पालघर आणि ठाण्याला मात्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या सरी काही ठिकाणी कोसळू शकतात. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पूर्वानुमानानुसार मंगळवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस आहे. पश्चिम महाराष्ट्रालाही या आठवड्यात दिलासा मिळेल अशी चिन्हे आहेत.

मुंबईमध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून उपनगरांमध्ये थोड्या थोड्या वेळाने जोरदार पाऊस पडत होता. दुपारीही हीच परिस्थिती कायम होती. एखादीच मोठी सर पाच-दहा मिनिटे येऊन मुंबईकरांना भिजवून गेली. शुक्रवार सकाळी ८.३० ते रात्री ८.३० पर्यंत कुलाबा येथे ३ मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे १२.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मोठ्या भरतीमुळे पाणी साचण्याचा धोका

मुंबईमध्ये शनिवार ते मंगळवार सलग चार दिवस मोठी भरती आहे. शनिवारी अति मुसळधार पावासाची शक्यता आहे. मात्र, रविवारी आणि सोमवारी अतिवृष्टीचा इशारा आहे. शनिवारी दुपारी १ वाजून २ मिनिटांनी ४.९६ मीटरची भरती आहे. तर रविवारी १ वाजून ४९ मिनिटांनी ४.९७ मीटरची भरती आहे. सोमवारीही दुपारी २ वाजून ३७ मिनिटांनी ४.८९ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. या काळामध्ये अतिवृष्टी झाल्यास मुंबईमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी ४.७० मीटरच्या लाटा उसळतील अशी माहिती मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *