भारतीय फँटसी स्पोर्ट्स गेम ॲप असलेल्या ‘ड्रीम ११’मध्ये खात्रीशीर संघ निवडून कोटींचे बक्षीस मिळवून देण्याचे आमिष दाखवित सायबर चोरट्यांनी मांजरी बुद्रुक येथील गृहिणीची तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक केली. या महिलेला टेलिग्राम व व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाइन गेमिंगचे आमिष दाखविणाऱ्या सायबर चोरट्यांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मांजरी बुद्रुक येथील देवनगरी कॉलनीत राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला गृहिणी असून, समाजमाध्यमांत ड्रीम ११ संदर्भातील व्हिडीओ पाहताना त्यांना टेलिग्राममधील विविध ग्रुपमध्ये सहभागी होण्याबाबत मेसेज आला. ‘‘ड्रीम ११’मध्ये जिंकण्यासाठी खात्रीशीर संघ निवडून देतो, कर्णधार, उपकर्णधारांची योग्य माहिती मिळेल, फक्त आधी पैसे भरावे लागतील,’ असे आमिष सायबर चोरट्यांनी दाखविले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने सायबर चोरट्यांनी पाठवविलेल्या स्कॅनरवर; तसेच बँक खात्यांवर वेळोवेळी पैसे भरले.
तुमची टीम जिंकल्यानंतर मिळणाऱ्या पैशांतून दहा टक्के रक्कम द्यावी लागेल, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी या महिलेकडून तब्बल १४ लाख २२ हजार ३६६ रुपये उकळले. मात्र, ऑनलाइन गेमिंग ॲप मध्ये जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. शिल्लक पैसेही संपल्याने हवालदिल झालेल्या महिलेने पुणे सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) (फसवणूक), ३१९ (२) (तोतयेगिरी करून फसवणूक) आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ डीनुसार गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्यांनी वापरलेले व्हॉट्सॲप क्रमांक, टेलिग्राम चॅट्स व बँक व्यवहारांचे तपशील तपासून त्यांचा माग काढण्यात येत आहे.
फँटसी गेमिंगच्या आकर्षणातून फसवणूक
फँटसी गेमिंग ॲप मधील कोट्यवधींचे बक्षीस क्रीडाप्रेमींना मोहावते. त्याचा गैरफायदा घेत सायबर चोरटे समाजमाध्यमांतून फसवे ग्रुप चालवून क्रीडाप्रेमींना जिंकून देण्याची बतावणी करतात. खात्रीशीर टीम लावून देण्याच्या नावाखाली सुरुवातीला लहान रक्कम मागवितात. त्यानंतर सल्लागार फी, टॅक्स, अनलॉक फी अशा नावाखाली लाखो रुपये उकळतात. अशा प्रकारे क्रीडाप्रेमींची फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
फसवणूक टाळण्यासाठीचे उपाय
अनोळखी टेलिग्राम/व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका.
‘परफेक्ट टीम’ किंवा ‘खात्रीशीर विजय’ अशा आमिषांवर विसंबून कोणालाही पैसे पाठवू नका.
गेमिंग/गुंतवणुकीसाठी अधिकृत अॅप/संकेतस्थळांचाच वापर करा.
अनोळखी व्यक्तींना बँक खाते यूपीआयची माहिती, ओटीपी देऊ नका.
संशयास्पद संदेश, फसवणूक झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन १९३० किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा.