मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्याची धडपड शिवसेनेची सुरू आहे, मात्र रात्री बारा वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचीही मागणी मान्य झाली नाही. सरकारने महापालिकेची ही रात्री बारा वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मागणीच फेटाळून लावली.
कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत कामगार आणि खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८मध्ये सुधारणा करता येणार नसल्याचे स्पष्ट करत ही दुकाने रात्री दहा वाजेपर्यंतच सुरू राहतील, असे कळवले आहे.
मुंबईतील दुकाने रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा ठराव २१ नोव्हेंबर २०१३ रोजी महापालिका सभागृहात केला होता. हा ठराव करून आयुक्तांकडे अभिप्रायसाठी पाठवताना तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी सरकारला पत्र पाठवून यासाठी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने कामगार व खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांना १८ जून रोजी पत्र पाठवले आहे.
यामध्ये दुकाने रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्यास गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून महिलांविरुद्धचे विनयभंग, छेडछाड तसेच सोनसाखळी चोरी, जबरी चोरी व इतर प्रकारच्या समाजविघातक कृत्यांमध्ये वाढ होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे. त्यामुळे कामाचा प्रचंड ताण असलेल्या मुंबई पोलिसांवर आणखी ताण निर्माण होईल. यामुळेच मुंबईतील दुकाने रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासंदर्भात मुंबई पोलीस दलाचीही हरकत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
एखादा दुकानास व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने तसेच निश्चित कारणासाठी या अधिनियमातील कोणत्याही कलमातून सूट हवी असल्यास जसे की ठरावीक वेळेत उघडणे आणि बंद करायचे असल्यास दुकानदार सरकारकडे अर्ज करू शकतात. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर काही अटी व शर्तीच्या अधीन राहून दुकानदाराला त्यांच्या विनंतीनुसार सूट देण्यात येईल.

