विमानाचा प्रवास म्हणजे महागडा. तो केवळ श्रीमंत, उच्चभ्रूंनाच परवडतो. मात्र आता सर्वसामान्यांना हा विमानप्रवास आवाक्यात येण्याची चिन्हे आहेत. यासाठी विमानाचे तिकीट चक्क हप्त्यावर देण्याची अभिनव योजना स्पाईसजेट या विमान कंपनीने आणली आहे.
ग्राहकांनी विमानाने प्रवास करावा, त्यानंतर तीन, सहा, नऊ व बारा महिन्यांच्या हप्त्यात त्याचे पैसे फेडावेत अशी ही योजना आहे. ‘बुकिंग करा, पैसे नंतर द्या’ ही योजना काही बॅँकांच्या ग्राहकांसाठी आणली आहे.
अॅक्सिस बॅँक, एचएसबीसी, कोटक बॅँक आणि स्टॅँडर्ड चार्टर्ड बॅँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना ही योजना उपलब्ध असेल. अन्य बॅँकांच्या ग्राहकांनाही ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. या तिकीटावर १२ ते १४ टक्के व्याज आकारले जाईल.

