काळबादेवी आगीतील मृत अधिकाऱ्यांना शौर्यपदक?

काळबादेवी आगीतील मृत अधिकाऱ्यांना शौर्यपदक?

दक्षिण मुंबईतील काळबादेवी भागातील इमारतीला लागलेल्या आगीत वीरमरण आलेल्या मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना शौर्यपदक देण्याची ​शिफारस राज्य सरकारतर्फे करण्यात येणार असून, यासंदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सरकारमार्फत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

मुंबई अग्निशमन दलातील त्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक मिळायला हवे याबाबत शिवसेनेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलताना डॉ. पाटील यांनी वरील घोषणा केली. काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी व जवानांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्या प्रचलित तरतुदीप्रमाणे आर्थिक मदत करण्यात आली आहे. या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे. तसेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

 दरम्यान, माहुल येथे मुंबई महापालिका तसेच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून सदनिका देण्यात आल्या आहेत. त्या राहण्यायोग्य नसल्याबाबतचा केंद्रीय पर्यावरण विभागाचा अहवाल असल्यास त्याबाबत विचार करण्यात येईल, असेही डॉ. पाटील यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत लोकभारतीचे सदस्य कपिल पाटील आणि शेकापचे जयंत पाटील यांनी काही प्रश्न सरकारला विचारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *