पोटगीसाठी नवऱ्याला चपलेने मारले!

पोटगीसाठी नवऱ्याला चपलेने मारले!

सुमित्रा आणि राघव यांचे पटत नसल्याने ते वेगळे राहात होते. सुमित्रासोबत १२ वर्षांची मुलगी होती. जवळ पुरेसे पैसे नाहीत, धुणी भांडी करून ती रोजचा खर्च चालवित असे. मुलीला शिकविताना तिला तारेवरची कसरत करावी लागत होती. पतीकडून पोटगी मिळत नाही, मुलीचा सांभाळ करण्यासाठी, तिची शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाहीत… अशा चिंतेने घेरलेल्या सुमित्रेने अखेर धाडसी निर्णय घेतला त्या दिवशी तिने कोर्टाच्या आवारात नवऱ्याला चपलेने मारले!

नवऱ्याकडून पोटगीची रक्कम मिळावी म्हणून सुमित्रेने कोर्टापुढे अर्ज केला होता. त्याची काही दिवस सुनावणी झाल्यावर त्या कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली झाली. त्यानंतर तब्बल १० महिने कोर्टाला न्यायाधीशच नव्हते. उपजिविकेचे ठोस साधन नाही, नवरा पोटगीचे पैसे देत नाही. पदरात मुलगी. तिला शाळेत घातले होते, पण शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने शाळेने मुलीला काढून काढण्याची धमकी दिली होती. या सगळ्या प्रकारात ती खचली होती.

 कोर्टाला अखेर न्यायाधीश मिळाले. सुमित्राच्या पोटगीच्या प्रकरणावर सुनावणी होणार होती. त्या दिवशी तिने कोर्टात येतानाच नवऱ्याला धडा शिकवायचा विचार केला होता. ‘माझ्याजवळ पैसे नाहीत. दोनच पर्याय माझ्यापुढे आहेत. विष घ्यायचे अथवा मुलीचे वर्ष वाया जाऊ द्यायचे,’ ती तिच्या वकिलांना म्हणाली. सुनावणी सुरू होण्याच्या आधी तिने नवऱ्याला कोर्टाकडे येताना पाहिले आणि तिची तळपायाची आग मस्तकाला गेली. पायातील चप्पल काढून तिने नवऱ्याला चोपून काढले. त्यानंतर तो त्याच्या वकिलाला भेटला. पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. कोर्ट सुरू झाल्यावर पतीच्या वकिलांनी न्यायाधीशांना सुमित्राने नवऱ्याला मारल्याचे कानावर घातले. त्याबद्दल कोर्टाने पत्नीच्या वकिलास विचारले असता त्यांनीही घडलेला प्रकार खरा असल्याचे मान्य केले. मात्र त्यामागील कारण जाणून घ्या, असे नमूद करीत त्यांनी पत्नीची अवस्था कथन केली. ते ऐकून संतापलेल्या न्यायाधीशांनी पतीला पिंजऱ्यात बोलावून घेतले. पत्नी व मुलीबद्दल त्याला काळजी नसल्याचे ऐकवून त्याची खरडपट्टी काढली. त्याच्या खिशात किती पैसे आहेत, असा सवाल त्यांनी केला. दोन हजार रुपये होते. न्यायाधीशांनी ही रक्कम त्याच्या पत्नीला ​दिली. कालांतराने दोघांचा घटस्फोट झाला. पतीकडून पत्नीला रितसर पोटगीही मिळाली. मात्र पोटगीसाठी लढा देताना पतीला चपलेने मारण्याचा धाडसी पवित्रा सुमित्रेला घ्यावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *