गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा शेतीवर होणारा फटका त्यातच शेतीसाठी घेतलेल कर्ज या दुहेरी ओझ्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करतो.
विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडता न आल्याने विदर्भातील अनेक शेतक-यांना आत्महत्येची वाट धरावी लागत आहे.
धक्कादायक म्हणजे अवघ्या १० हजार रुपयांच्या कर्जापायी विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती अभ्यासातून समोर आली आहे.
२०१२ ते एप्रिल २०१५ या तीन वर्षात विदर्भाच्या अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या भागातील तब्बल तीन हजार १४५ शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
आत्महत्या केलेल्या शेतक-यांपैकी तब्बल ९०० शेतक-यांवर १० ते १५ हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे अभ्यासातून उघड झाले आहे. अनेक शेतकरी संघटनाकडून याबाबतचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाअंती ही माहिती समोर आली आहे.
तसेच तरुण शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाणही अधिक आहे. आत्महत्या कऱणा-या चार पैकी एक शेतकरी हा ३० हून कमी वयोगटातील असल्याचे आढळून आले आहे.
२०१४ मध्ये सर्वाधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे विदर्भातील शेतक-यांसाठी अच्छे दिन तरी अद्याप आलेले नाहीत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये महाराष्ट्रात एकूण दोन हजार ५६८ शेतक-यांनी आत्महत्या केली. त्यापाठोपाठ तेलंगणमध्ये शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण ८९८ इतके होते तर मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण ८२६ इतके होते.

