मुलींची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

मुलींची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

किशोरवयीन मुलींची तस्करी करताना दोन जणाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओडिशामधील कंधमाल जिल्ह्यातून आंध्र प्रदेशमध्ये किशोवयीन मुलींना नेण्यात येत होते. दरम्यान कंधमाल येथील पोलिस पथकाने मुलींची सुटका केली. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बलिगुडा एस.एन. मुरमू यांनी दिली आहे.

मुलीच्या पालकांनी मुलींच्या अपहरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली. त्यामध्ये गंजम जिल्ह्यातील नरसिंहपूर येथील मीनाकेतन रेड्डी आणि कंधमाल जिल्ह्यातील माजामहा येथील सुकांती मल्लिक यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी पालकांच्या परवानगीशिवाय 7 जुलै रोजी 4 मुलींना माजामहा येथून आंध्रप्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात नेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी मुलींना दरमहा 5 हजार रुपयांच्या नोकरीचे तसेच नोकरीच्या ठिकाणी निवासाच्या व्यवस्थेचे आश्‍वासन दिले होते. मात्र या मुली अत्यंत गलिच्छ वातावरणात दिवसातील 10 ते 12 तास काम करत होत्या, अशी माहिती सुधीर सबत या बालहक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याने दिली आहे. त्यांनी “ऑपरेशन मुस्कान‘ अंतर्गत पोलिसांच्या मदतीने 1 जुलैपासून 25 मुलांसह 16 मुलींची वेगवेगळ्या ठिकाणांवरून सुटका केली आहे. त्यापैकी काही मुलांची तस्करी करण्यात आली होती. तर काही मुलींचे अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती कंधमालच्या तस्करी विरोधी विभागाचे बैदेही कुमारी बेहेरा यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *