रुळांवर पाणी भरल्यानं वाहतुकीचे तीनतेरा वाजलेत

 रुळांवर पाणी भरल्यानं वाहतुकीचे तीनतेरा वाजलेत

गेला महिनाभर घामाघूम झालेल्या आणि पाणी-वीजसंकटाच्या भीतीनं वरुणराजाला आर्त साद घालणाऱ्या मुंबई-ठाणेकरांना मुसळधार पावसानं चिंब भिजवून टाकलं आहे. काल सकाळी थोडी ‘हवा’ करणारा पाऊस संध्याकाळपासून बरसू लागला आणि रात्रभर त्याची संततधार सुरू राहिली. पावसाच्या पुनरागमनाच्या वर्दीनं सारेच सुखावले असले, हवेत धुंद गारवा पसरला असला, तरी मुंबईतील रेल्वेसेवा सकाळपासून विस्कळीत झाल्यानं नोकरदार-चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेवर सायन-कुर्ला स्टेशनात रुळांवर पाणी भरल्यानं वाहतुकीचे तीनतेरा वाजलेत, तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरही लोकल उशिरानं धावत आहेत.

पालघरमध्ये तर पावसानं कहर केलाय. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४४५ मिमी पाऊस कोसळलाय. वाणगाव आणि सफाळ्यात रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यानं डहाणूकडून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचा हा रागरंग पाहून प्रशासनानं शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. वसई-विरारमधील चांदीप गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून त्यात २० गावकरी अडकलेत. त्यामुळे एक-दोन दिवसांतच पाऊस सगळा अनुशेष भरून काढतो की काय, अशीच चिन्हं दिसताहेत.

जूनमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर, संपूर्ण राज्यात धुव्वाधार पाऊस पडला होता. जूनमधील पावसाचे अनेक विक्रम त्यानं मोडीत काढले होते. पण, त्यानंतर तो जो गायब झाला, तो झालाच. आज येईल, उद्या येईल म्हणून सारे त्याची वाट पाहत होते, पण पावसाची कुठलीच चिन्हं दिसत नव्हती. पावसाळा आहे की उन्हाळा, असा प्रश्न पडू लागला होता. ‘डिओ स्प्रे’ मारावा, तशा काही सरी अधे-मधे येत होत्या आणि उकाड्यात भर घालत होत्या. शेतीसाठी, विजेसाठी, पाण्यासाठी गरज होती ती जोरदार पावसाची. अखेर, रविवारी पावसानं पुनरागमनाचे संकेत दिले होते. पुण्यासह राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावसानं हजेरी लावली होती. त्यानंतर, काल सकाळी मुंबई, ठाणे, कोकण पट्टयात पाऊस पडला होता. पण त्यानं खरा जोर धरला, तो संध्याकाळपासून. मुंबई शहर, उपनगरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून ठाणे, पालघर जिल्ह्यात आणि कोकणातही रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे सगळीकडचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *